देवराष्ट्रे वार्ताहर
Prithviraj Deshmukh : पाऊस लांबल्याने सर्वत्र पाणी आणी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील ताकारी,टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजना सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असुन, येत्या दोन ते तीन दिवसात या तिन्ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या चांदोली धरणात अकरा टीएमसी पाणीसाठा आहे.त्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करायला अडचण नाही.परंतु टेंभू व ताकारी सिंचन योजना कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.सध्या कोयना धरणात पंचवीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे.तर कृष्णा नदीच्या पात्रातही बऱ्या पैकी पाणी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असुन, येत्या दोन ते तीन दिवसात योजना सुरू होत आहेत. जिल्हातील या तीनही सिंचन योजना सुरू होत असल्याने योजनांच्या कार्यक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.