भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी नेत्यांची इच्छुकांनी “रिंग” केल्याने अस्वस्थता
सांगली : भाजपच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातील काही इच्छुकांचा प्राधान्यक्रम ठरवून सुरेश हाळवणकर यांच्याकडे रविवारी सुपूर्द करण्यात आला. आणखी काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहून पक्षाकडून नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडीवेळी रिंग करून काही नेत्यांनी एकमेकांत प्राधान्यक्रम ठरवून मतदान केल्याने भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मंडळ अध्यक्ष निवडीवेळी पक्षाच्या प्रमुख मंडळींना ज्या युवकांना प्राधान्याने पुढे न्यायचे होते, त्यांना हमखास बाजूला करावे लागल्याने काही प्रमाणात अस्वस्थता आहे. त्यात नव्या निवडीमध्ये झालेली रिंग चर्चेचा विषय असून कोणाची नावे निश्चित होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.सांगलीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रकाश ढंग यांनी आपणास कमी कालावधी मिळाल्याने पुन्हा संधी मिळावी अशी मागणी केली आहे. तर इतर इच्छुकांमध्ये पृथ्वीराज पवार, स्वाती शिंदे, विश्वजीत पाटील, पांडुरंग कोरे, संगीता खोत यांची नावे पुढे आली होती.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी नेमके प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात पक्ष निरीक्षक हळवणकर यांनी बैठक घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पहिल्या तीन क्रमांकाचे पसंती क्रम बंद लिफाफ्यातून मिळवले. अंतिम अहवाल निरीक्षक प्रदेश कार्यकारणीकडे पाठवतील आणि प्रदेशाध्यक्ष शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करतील असे सांगण्यात आले.
आजी माजी आमदार, विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस, महिला व युवा मोर्चा तसेच मागासवर्गीय मोर्चाचे पदाधिकारी अशा 27 जणांना मतांचा अधिकार देण्यात आला होता, त्यांच्याकडून एक ते तीन अशा पसंती क्रमाने यादी घेण्यात आली आहे. आता या मतदानात कोण कोणाच्या बाजूने उभे राहते आणि अंतिम निर्णय घेताना प्रदेश पातळीवर कोणाचे ऐकले जाते याबाबत जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.








