पवासाऴी अधिवेशनाच्या तोंडावर अजित पवार यांनी आपल्या 8 समर्थक आमदारांसह सरकारला पाठींबा दिल्यानंतर भाजपने 2024 च्या निवडणूकीसाठी जोरात कंबर कसली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नविन चेहऱ्यांना संधी देत ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकारणीमध्ये ही नविन निवडी झाल्या असून कोल्हापूर शहर महानगर अध्यक्षपदाची माळ विजय जाधव यांच्या गळ्यात पडली आहे. तसेच कोल्हापूर ग्रामिण अध्यक्षपदाची जबाबदारी राहूल देसाई यांच्यकडे देण्यात आली असून हातकणंगले मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. सांगलीच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी राजवर्धन निंबाळकर तर सांगली ग्रामिण अध्यक्षपदी प्रकाश ढंग यांची निवड केली आहे.
या संदर्भात घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये बोलताना ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.” असे त्यांनी सांगितले.









