सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदचे भाजप नगरसेवक विजय ताड यांची हत्या भाजपचेच दुसरे नगरसेवक उमेश सावंत यांनी सुपारी देऊन केली होती. या हत्येप्रकरणातील मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. पण मुख्य सूत्रधार उमेश सावंत गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देत मोकाट फिरत आहे. म्हणून आज मृत नगरसेवक विजय ताड यांच्या कुटुंबियांनी सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
पोलीस,भाजपचे अन्य ज्येष्ठ नेते हे या हत्येचा सूत्रधार उमेश सावंत याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विजय ताड याचा भाऊ विक्रम ताड याने सुत्रधाराला १५ दिवसांत अटक नाही केली तर पालकमंत्र्यांच्या घरासमोर परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यापूर्वीही पोलीस अधीक्षक , जिल्हाधिकारी , कोल्हापूर परिक्षेत्राचे आय.जी सुनील फुलारी यांना या खुनप्रकरणाचा तपास होण्यात पोलीस जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याबाबत निवेदन दिले होते. आज विक्रम ताड या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.