बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांमागे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान असल्याचा आरोप शिवसेना ( ठाकरे गटाचे ) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ज्या भागात भाजप ( BJP ) कमकुवत आहे आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव होऊ शकतो अशा ठिकाणी दंगली होत असल्याचा दावाही त्यांनी केला. बिहारमधील सासाराम आणि बिहार शरीफ तसेच पश्चिम बंगालच्या हुगळी आणि हावडा जिल्ह्यात रामनवमीच्या वेळी हिंसाचार उसळल्यानंतर राऊत यांचे वक्तव्य समोर आले आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राउत म्हणाले, “हे भाजपने रचलेले षडयंत्र आहे. या दंगली अशा ठिकाणी होत आहेत जिथे भाजप कमकुवत आहे आणि जिथे 2024 मध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो. बिहारमध्ये त्यांचे सरकार आल्यावर सर्व दंगलखोरांना उलटे लटकवले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठामपणे सांगितले होते. सध्या केंद्रात तुमचेच सरकार आहे. तुम्ही कोणाची वाट पाहत आहात.” असा सवाल त्यांनी केला. काही दिवसापुर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार दौरा केला होता. आपल्या रॅलीदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी बिहार राज्यात भाजप सत्तेवर आल्यास दंगलखोरांना “उलटे टांगले जाईल” असे अश्वासन दिले होते.