नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा आता रंगात येऊ लागली आहे. ही निवडणूक येत्या 18 जुलैला होणार आहे. केंद्रात सत्ताधारी असणाऱया भाजप-रालोआचा उमेदवार कोण असेल हा उत्सुकतेचा विषय आहे. सध्या सत्ताधारी वर्तुळात 10 नावांची चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपमध्ये चर्चिल्या जाणाऱया नावांमध्ये थावरचंद गेहलोत यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. ते सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. ते मध्यप्रदेशातील दलित समुदायातील आहेत. त्यांच्यानंतर अनुसूया उईके आणि द्रौपदी मुर्म या आदिवासी समाजातील महिलांची नावेही आघाडीवर आहेत. केरळचे राज्यपाल मोहम्मद अरीफ खान आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांच्याही नावांचा विचार होत आहे.
व्यंकय्या नायडू चर्चेत
याशिवाय, सध्या उपराष्ट्रपती असणारे व्यंकय्या नायडू यांचीही निवड भाजपकडून केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. याखेरीज बिहारचे राज्यपाल फागू चौहान, हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय, तेलंगणाच्या राज्यपाल तामिलसाई सुंदरराजन इत्यादी नावेही विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते.
गेल्यावेळचे धक्कातंत्र
अनेक नावांची चर्चा असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात जे नाव आहे, तेच ऐनवेळी घोषित पेले जाईल, असेही बोलले जाते. गेल्यावेळीही अशीच अनेक नावांची चर्चा होती. तथापि, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानकपणे त्यावेळी बिहारचे राज्यपाल असणाऱया रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आले आणि तेच नंतर देशाचे राष्ट्रपती झाले होते. यंदाही असेच धक्कातंत्र उपयोगात आणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा ?
विरोधी पक्षांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संयुक्त उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांचे पर्याय सुचविले होते. मात्र, या तीन्ही नेत्यांनी नकार दिल्याने आता तृणमूल काँगेसकडूनच यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.









