वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील संभल येथील दंगलपिडित कुटुंबांना राहुल गांधींनी भेट दिल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. संभलमध्ये मुस्लीमांच्याच दोन गटांमध्ये दंगल होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झालेला नाही, असे उत्तर प्रदेश प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी हे मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाल्याचा आरोप केला आहे.
या दंगलीचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. कोणत्याही व्हिडीओत पोलीस गोळीबार करताना दिसत नाहीत. ज्या गोळ्या सापडल्या आहेत, त्या देशी पिस्तुलांमधून झाडल्या गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्या पोलिसांच्या गन्समधील नाहीत, हे फोरॅन्सिक चाचणीत स्पष्ट झाले आहे. तरीही असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे.
भेटीवरुन वाद
राहुल गांधी यांनी संभल दंगल पिडितांना भेट देणे याचा अर्थ दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या लोकांना भेट दिल्याप्रमाणे आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. काँग्रेसला नेहमीच जेहादी प्रवृत्तीच्या लोकांसंबंधी प्रेम आणि आकर्षण वाटत आले आहे, अशीही खोचक टीका भारतीय जनात पक्षाने केली आहे.









