काँग्रेस ही तर ‘लष्कर ए पाकिस्तान’: भाजपचा वार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टरवरुन भारतीय जनता पक्ष आणि या पक्षात वाद उफाळून आला आहे. या पोस्टरमध्ये एक शीरविहीन व्यक्ती दाखविण्यात आला आहे. या व्यक्तीचे नाव देण्यात आले नसले, तरी पोस्टरखालच्या ओळींमधून ही व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्याचा भाव निर्माण होतो. काँग्रेसच्या या पोस्टरचे कौतुक पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहे. याच पोस्टरवर भारतीय जनता पक्षानेही चौफेर टीका केली असून काँग्रेस म्हणजे लष्कर ए पाकिस्तान आहे, अशी खोचक टिप्पणी करत प्रतिवार केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या या पोस्टरवर हल्लाबोल केला. या पोस्टरवरुन काँग्रेसची मनोवृत्ती स्पष्ट होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधातील या पक्षाची भावनाही उघड होते. पेहलगाम हल्ल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित नव्हते. मात्र, याचा अर्थ असा नव्हे, की त्यांनी हा हल्ला गंभीरपणे घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून आणखी धक्के आगामी काळात पाकिस्तानला देण्यात येतील, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे.
काँग्रेस म्हणजे लष्कर एक पाकिस्तान
काँग्रेसच्या पोस्टरला पाकिस्तानातून कौतुकाचा प्रतिसाद मिळतो, याचा अर्थच काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे, हे उघड होत आहे. असे आजवर अनेकवेळा झाले आहे. काँग्रेस हा भारतातीलच पक्ष आहे. तथापि, त्याला लष्कर ए पाकिस्तान काँग्रेस असे संबोधल्यास चुकीचे ठरु नये. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर हे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. यातून पाकिस्तानला एक महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. तो असा की, या देशात ‘मीर जाफरां’ची, अर्थातच फितुरांची कमतरता नाही. अलिकडच्या काळात ‘सर तन से जुदा’ ही लष्कर ए पाकिस्तान काँग्रेसची विचारधारा झाली आहे. अशी पोस्टर्स काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज्ञेवरुन निर्माण केली जात आहेत. अशा पोस्टर्समुळे देशाची मान लाजेने खाली जाते. सध्याच्या संवेदनशील परिस्थितीतही भारत दुर्बळ कसा होईल, हेच काँग्रेसकडून पाहिले जात आहे, अशी घणाघाती टीका गौरव भाटिया यांनी केली.
काँग्रेस यशस्वी होणार नाही
भारताचा कितीही अवमान केला आणि भारताला दुर्बळ बनविण्याचा प्रयत्न कितीही झाला, तरी काँग्रेस पक्ष यशस्वी होणार नाही. सर्वसामान्य भारतीय नागरीकाला आता काँग्रेसचे खरे स्वरुप उमगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे भारतातील कोट्यावधी मतदार ठामपणे उभे आहेत. त्यांच्या समर्थनामुळेच भारतीय जनता पक्ष मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे काँग्रेस आमचा मत्सर वाटतो. या मत्सरापोटी काँग्रेस नेते बेताल आणि बेछूट आरोप करतात. पण लोकांवर त्यांचा काहीही परिणाम होत नाही. काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्याच्या नादात आपले खरे स्वरुप उघडे केले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी भविष्यकाळ उज्ज्वल नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
काँग्रेसची अवस्था मुस्लीम लीगसारखी
काँग्रेसचे रुपांतर आता मुस्लीम लीगमध्ये झाले आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने त्याच्या एक्स हँडलवरुन केला आहे. ‘सर तन से जुदा’ या दहशतवादी मनोवृत्तीने आता काँग्रेसमध्येही प्रवेश केला आहे. भारत तोडणाऱ्या मुस्लीम लीगच्या मार्गानेच काँग्रेसचा प्रवास होत आहे. काँग्रेस आता विभाजनवादी, दिशाहीन आणि हताश झालेली आहे. अशा गलितगात्र झालेल्या. पण उन्मत्तपणा न सोडलेल्या काँग्रेसला भारतीय जनताच मोडीत काढणार असून नामशेष करणार आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाने आपल्या एक्स हँडलवर लगावला आहे.









