भाजपची दुसरी, तर काँग्रेसची पहिली सूची, वसुंधराराजे, गेहलोत, पायलट यांना उमेदवारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थानात भाजप आणि काँग्रेसने आपल्या अनेक उमेदवारांची नावे घोषित केली असून आता प्रचाराला अधिक रंग चढणार आहे. राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून 3 डिसेंबरला मतगणना होणार आहे. शनिवारी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी तर काँग्रेसने पहिली उमेदवारी सूची प्रसिद्ध केली. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपकडून, तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना काँग्रेसने अनुक्रमे झालरपाटण आणि सरदारपुरातून उमेदवारी दिली.
काँग्रेसमधील गेहलोत यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांना त्यांच्या परंपरागत टोंक मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. भाजपच्या दुसऱ्या सूचीत 83 उमेदवारांची नावे आहेत. तर काँग्रेसच्या पहिल्या सूचीत 33 उमेदवार आहेत. भाजपच्या दुसऱ्या सूचीनुसार दिवंगत नेते भैरवसिंग शेखावत यांचे जावई नरपतसिंग राजवी यांना चितोड मधून तर ज्येष्ठ नेते गजेंद्रसिंग शेखावत यांना अन्य मतदारसंघ देण्यात आला आहे. सांगानेर मतदारसंघात भाजपच्या राजस्थान राज्यशाखेचे नेते भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून समतोलाचा प्रयत्न
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्या गटांमधील उमेदवारांना स्थान देण्यासाठी काँग्रेस गोटात बराच काळ चर्चा करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांची पहिली सूची घोषित करण्यास दोन दिवस अधिक वेळ लागला. पायलट गटाच्या जवळपास सर्व इच्छुकांना तिकीटे देण्यात आल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोटात मात्र, उमेदवारांच्या नावांवरुन नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ 33 उमेदवारांची नावे देण्यात आली.
दोन विद्यमानांना वगळले
भाजपने आपल्या दोन विद्यमान ज्येष्ठ आमदारांना तिकीटे नाकारली आहेत. चितोड मतदारसंघात चंद्रभान सिंग आणि सांगानेरमध्ये अशोक लाहोटी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपच्या दुसऱ्या सूचीत एकंदर आठ विद्यमान आमदारांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. सूर्यकांता व्यास (जोधपूर), सुभाष पुनिया (सूरजगढ), ललित ओस्तवात (बडी सादडी), मोहनराम चौधरी (नागौर), रुपाराम मुरावतीया (मकराना) अशी उमेदवारी न दिलेल्या काही आमदारांची नावे आहेत. जिंकण्याच्या क्षमतेवर तिकीटे देण्यात आली आहेत.
प्रथम सूचीमध्ये काही परिवर्तन
भाजपच्या प्रथम सूचीत 41 उमेदवारांची नावे होती. या सूचीत राज्यवर्धनसिंग राठोड आणि दियाकुमारी यांच्यासह सात खासदारांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली होती. तथापि, दुसऱ्या सूचीत दियाकुमारी यांचा उमेदवारी नाकारण्यात आल्याचे दिसत आहे. झुनझुनू खासदार नरेंद्र कुमार, अलवार खासदार बाबा बालकनाथ, अजमेर खासदार भगीरथ चौधरी, जालोर खासदार देवजी पटेल तसेच राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनेही दोघांना वगळले
काँग्रेसनेही आपल्या दोन विद्यमान आमदारांना यंदा तिकिटे नाकारली आहेत. काँग्रेसच्या सूचीत 9 महिला आहेत. कृष्णा पुनिया, सीता चौधरी, डॉ. अर्चना शर्मा इत्यादी महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अमित नौहार, ममता भूपेश, मंजू देवी, दिव्या मदेरणा, मनीषा पन्वर, रमिला खाडिया, प्रीती शेखावत इत्यादी उमेदवारांना यावेळीही संधी देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातही भाजपची पाचवी सूची
मध्यप्रदेशात भाजपने 92 उमेदवारांची पाचवी सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीत अनेक दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच खासदार कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश यांना तिकीट देण्यात आले आहे. आकाश हे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय, बाबूलाल मेवरा, कमलेश जातव, नरेंद्रसिंग कुशवाहृ राकेश शुक्ला, मायासिंग, देवेंद्रकुमार जैन, जसपालसिंग, राकेश गिरी इत्यादी नेत्यांना संधी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक आली रंगात…
ड राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपच्या उमेदवारांची दुसरी सूची प्रसिद्ध
ड राजस्थानात दोन दिवसांच्या विलंबानंतर काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध
ड राजस्थानच्या दुसऱ्या सूचीत भाजपने आठ विद्यमानांना तिकीट नाकारले
ड काँग्रेसनेही राजस्थानात दोन विद्यमानांना पुन्हा उमेदवारीपासून वगळले