10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट : 44 जणांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट स्पष्ट : राज्यात फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील 10 आमदारांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यामध्ये 8 भाजप आमदारांसह एनपीपी आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार समाविष्ट होता. आमदारांच्या या शिष्टमंडळाने 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचे मत राज्यपालांसमोर व्यक्त केले आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 31 इतका आहे.
राज्यपालांना भेटल्यानंतर भाजप आमदार ठोकचोम राधेश्याम यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ‘काँग्रेस वगळता 44 आमदार मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. नवीन सरकार स्थापनेला विरोध करणारा कोणीही नाही. मणिपूर विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत यांनी 44 आमदारांची भेट घेतली आहे’, असे राधेश्याम यांनी सांगितले. दुसरीकडे, केंद्रीय नेतृत्वाच्या आवाहनावरून विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत दिल्लीला रवाना झाले आहेत. सरकार स्थापनेबाबत हायकमांडचा निर्णय लवकरच येऊ शकतो.
बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट
मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजी भाजप सरकारचे नेतृत्व करणारे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. राज्यात दीड वर्षांहून अधिक काळ चाललेला हिंसाचार थांबवू न शकल्याने बिरेन सिंग यांच्यावर खूप दबाव होता. 3 मे 2023 पासून मणिपूरमध्ये कुकी-मैतेईमध्ये हिंसाचार सुरू आहे. या दोन वर्षांत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दीड हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याव्यतिरिक्त 70 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. हिंसाचारप्रकरणी 6 हजारांहून अधिक एफआयआर दाखल झाले आहेत. हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधी पक्ष एनडीएला सतत प्रश्न विचारत होते.
सध्या मणिपूरमध्ये 37 भाजप आमदार
60 जागांच्या मणिपूर विधानसभेत सध्या 59 आमदार आहेत. आमदाराच्या मृत्यूमुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे 32 मैतेई आमदार, 3 मणिपुरी मुस्लीम आमदार आणि 9 नागा असे एकंदर 44 आमदार आहेत. त्यापैकी भाजप आमदारांची संख्या 37 इतकी आहे. काँग्रेसचे 5 आमदार असून ते सर्व मैतेई समुदायातील आहेत. उर्वरित 10 आमदार कुकी समुदायातील असून त्यापैकी 7 आमदार 2022 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. तर दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आणि एक अपक्ष आहे.









