काँग्रेस-आपचा निवडणुकीवर बहिष्कार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील महापालिका स्थायी समिती निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आहेत. एका रिक्त पदावर भाजपचा विजय झाला आहे. एमसीडी सदनातील स्थायी समिती सदस्याच्या रिक्त जागेवर भाजपचे नगरसेवक सुंदरसिंग तंवर विजयी झाले आहेत. त्यांना 115 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. या निवडणुकीत केवळ 115 नगरसेवकांनी भाग घेतला. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सभागृहात एकंदर 249 नगरसेवक आहेत.
एमसीडीमधील स्थायी समितीच्या 18 व्या सदस्याच्या निवडणुकीसाठी एकूण 2.5 तासांचा अवधी देण्यात आला होता. मात्र अवघ्या तासाभरात निवडणूक संपली. कारण मतदानात भाजपचेच नगरसेवक सहभागी होत होते. तर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेसने गुरुवारीच निवडणुकीपासून दूर राहण्याची घोषणा केली होती.
दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी एमसीडी आयुक्तांना स्थायी समिती सदस्यांसाठी 5 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. महापौरांनी एमसीडी आयुक्तांना पत्र लिहिले. त्यांनी आयुक्तांनी जाहीर केलेली स्थायी समिती सदस्य निवड बेकायदेशीर ठरवली. दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेबाहेर निदर्शने केली. गुऊवारी दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी कुमार यांनी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश जारी केले. निवडणुकीबाबत दिल्ली सरकार, महापौर आणि राजनिवास यांच्यात झालेल्या संघर्षानंतर एलजीच्या आदेशानुसार आयुक्तांनी रात्री निवडणुकीची सूचना जारी केली होती.