वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार व हिंडलगा ग्रा.पं. अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी सोमवारी (दि.17) हजारो समर्थकांसह भव्य मिरवणूक आणि शक्तिप्रदर्शन करून भाजपतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये भाजपतर्फे हिंडलगा येथील उद्योजक नागेश मनोळकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून भव्य पदयात्रेने तहसील कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य भाजप महिला अध्यक्षा चित्रा वाघ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव, महिला मोर्चा पदाधिकारी डॉ. सोनाली सरनोबत, भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम, रामचंद्र मनोळकर यांच्यासह भाजप नेते, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









