नौक्षम चौधरींना उमेदवारी
राजस्थानमधील एक महिला उमेदवार सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.स्वत:च्या सौंदर्यामुळे नौक्षम चौधरी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तर भाजपकडून उमेदवारी मिळाल्यावर त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नौक्षम यांनी यापूर्वी हरियाणा विधानसभा निवडणूक लढविली आहे. तेथे त्यांना यश मिळाले नसले तरीही भाजपने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत राजस्थानात उमेदवारी दिली आहे.
कांमा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार असणाऱ्या नौक्षम चौधरी या हरियाणाच्या रहिवासी आहेत. त्यांची आई रणजीत कौर या हरियाणात आयएएस अधिकारी आहेत. तर वडिल आर.एस. चौधरी हे निवृत्त न्यायाधीश आहेत. नौक्षम यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण प्राप्त केल्यावर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे.
लंडनमधून शिक्षण घेत परतलेल्या नौक्षम यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. नौक्षम चौधरी या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान विद्यार्थी नेत्या राहिल्या आहेत. याचमुळे राजकारणाकडील त्यांचा ओढा कायम राहिला आहे. आता राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत त्या मुस्लीमबहुल मेवात या क्षेत्रात निवडणूक लढवत आहेत.
मंत्री जाहिदा खान यांना आव्हान
भाजप उमेदवार नौक्षम चौधरी या स्वत:च्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. भाजपने त्यांना भरतपूर जिल्ह्यातील कांमा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या मतदारसंघात त्या गेहलोत सरकारमधील मंत्री जाहिदा खान यांना आव्हान देत आहेत. जाहिदा खान यांना यावेळी काँग्रेसमध्येही तीव्र विरोध होत आहे. नौक्षम यांना स्थानिक स्तरावर लक्षणीय पाठिंबा देखील मिळतोय.
हरियाणातही लढविली निवडणूक
2019 मध्ये भाजपने नौक्षम यांना हरियाणा विधानसभा निवडणुकीत पुन्हाना मतदारसंघात संधी दिली होती. तेथे त्यांना काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद इलियास यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु भाजपने यावेळी त्यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत संधी दिली आहे. पक्ष आणि नौक्षम दोघांनाही निवडणुकीत विजय मिळेल अशी अपेक्षा वाटत आहे.









