कोईम्बतूरमधून के. अन्नामलाई : 9 जणांची तिसरी यादी जाहीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजपने गुऊवारी तामिळनाडूमधील लोकसभेच्या नऊ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन चेन्नई दक्षिणमधून तर प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना कोईम्बतूरमधून तिकीट मिळाले आहे. पक्षाने द्रमुकचे माजी नेते आणि विद्यमान खासदार टी. आर. पारिवेंधर आणि केंद्रीय मंत्री एल मुऊगन यांना अनुक्रमे पेरांबलूर आणि निलगिरीमधून उमेदवारी दिली. माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन कन्याकुमारीमधून निवडणूक लढवणार आहेत. चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी. सेल्वम, वेल्लोरमधून ए. सी. षणमुगम, कृष्णगिरीमधून सी. नरसिंहन आणि थुथुक्कुडीमधून नैनर नागेंद्रन निवडणूक लढवणार आहेत, असे पक्षाने सांगितले. राज्यातील 39 लोकसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये भाजपने पीएमकेसोबत निवडणूकपूर्व युती केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूमधून एकही जागा जिंकता आली नव्हती. आता भाजपने येथे चंचूप्रवेश करण्यासाठी राज्यातील ‘हेवीवेट’ नेत्यांची फौज उभी केली आहे. त्यादृष्टीनेच तीन दिवसांपूर्वी तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा देणाऱ्या तमिलिसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
मतदारसंघनिहाय भाजप उमेदवार
- चेन्नई दक्षिण टी सुंदरराजन
- चेन्नई मध्य विनोद पी सेल्वम
- कोईम्बतूर अन्नामलाई
- निलगिरी एल. मुऊगन
- वेल्लोर एसी. षणमुगम
- कृष्णगिरी सी. नरसिंहन
- पेरांबलूर टी. आर. पारिवेंधर
- थोथुक्कुडी नैनर नागेंद्रन
- कन्याकुमारी राधाकृष्णन









