हरियाणातून रेखा शर्मा यांना संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी आंधप्रदेशातून रयागा कृष्णैया, हरियाणातून रेखा शर्मा आणि ओडिशातून सुजीत कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भाजपने हरियाणातून रेखा शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. रेखा शर्मा या पंचकूलाच्या रहिवासी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत रेखा शर्मा या अत्यंत सक्रीय होत्या. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार नसण्याची शक्यता असल्याने 13 डिसेंबर रोजी त्यांना बिनविरोधी विजयी घोषित केले जाऊ शकते.
रेखा शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना झटका बसला आहे. यात प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांचे नावही सामील आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. याचबरोबर करनाचे माजी खासदार संजय भाटिया, सिरसाच्या माजी खासदार सुनीता दुग्गल आणि हरियाणाचे माजी मंत्री बनवारीलाल, माजी आमदार सत्यप्रकाश जरावता यांचाही अपेक्षाभंग झाला आहे.
आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. वायएसआर काँग्रेसचे खसदार वेंकटरमण मोपीदेवी, बीडा मस्तान राव यादव आणि रयागा कृष्णैया यांनी ऑगस्ट महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर ओडिशात सुजीत कुमार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर हरियाणा विधानसभेवर निवडून आयाने कृष्णलाल पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.









