कपिल मिश्रा यांना करावल नगरमधून तिकीट : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी रात्री उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत 29 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत पाच महिला उमेदवारांचाही समावेश आहे. आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील झालेले कपिल मिश्रा यांना करावल नगरमधून, तर हरीश खुराणा यांना मोती नगरमधून आणि प्रियंका गौतम यांना कोंडली विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत समाविष्ट असलेले कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कस्तुरबा नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे नीरज बसोया हे काँग्रेस पक्षाचे आमदार देखील राहिले आहेत. भाजपने नरेला येथून राज करण खत्री, तिमारपूर येथून सूर्य प्रकाश खत्री, मुंडका मतदारसंघातून गजेंद्र दलाल, किरारी येथून बजरंग शुक्ला, सुलतानपूर मजरा मतदारसंघातून करम सिंह कर्मा, शकूर बस्ती येथून करनैल सिंह, त्रिनगरमधून तिलक राम गुप्ता यांना तिकीट दिले आहे. तसेच सदर बाजार येथून मनोज कुमार जिंदाल, चांदणी चौक येथून सतीश जैन, मतिया महल येथून दीप्ती इंदोरा, मादीपूर येथून उर्मिला कैलाश गंगवाल, हरी नगर येथून श्याम शर्मा, तिलक नगर येथून श्वेता सैनी, विकासपुरी पंकज कुमार सिंग, विकासनगरमधून पवन शर्मा यांना उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय, द्वारका येथून प्रद्युम्न राजपूत, मटियाला येथून संदीप सेहरावत, नजफगड येथून नीलम पहेलवान, पालम येथून कुलदीप सोलंकी, राजिंदर नगर येथून उमंग बजाज, कस्तुरबा नगर येथून नीरज बसोया आणि तुघलकाबाद येथून रोहतास बिधुरी हे निवडणूक रिंगणात असतील.









