राजकारणात काहीच अशक्य नसल्याचे वक्तव्य
►वृत्तसंस्था / चंदीगड
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांनंतर शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली होती. शिरोमणी अकाली दलाला आता पुन्हा एकदा स्वत:च्या जुन्या सहकाऱ्याची आठवण सतावू लागली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यावर शिरोमणी अकाली दल आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी करू पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीतूनही याचे संकेत मिळाले आहेत.
राजकारणात काहीच अशक्य नाही, दोन्ही पक्षांसंबंधी काही मुद्दे असून त्यावर तोडगा काढावा लागणार असल्याचे वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते महेशइंद्र सिंह ग्रेवाल यांनी केले आहे. भाजपसोबत कुणीच नसताना शिरोमणी अकाली दलाने त्याला साथ दिली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व सहकारी पक्षांना सोबत घेऊन केंद्रात रालोआचे सरकार चालविले होते. परंतु नरेंद्र मोदींनी निर्णयप्रक्रियेत आमच्या पक्षाला सामील केले नव्हते असेही ग्रेवाल यांनी म्हटले आहे.
आम्ही कुठल्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाहीत. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे काँग्रेससोबत आम्ही आघाडी करणार आहे. भाजपने आघाडीतील घटकपक्षांना योग्य सन्मान देण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही रालोआत परतण्याचा विचार करू शकतो असे ते म्हणाले.
कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, परंतु हरियाणातील स्वतंत्र गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या स्थापनेसोबत देशातील विविध तुरुंगांमध्ये कैद शिखांच्या मुक्ततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. यासंबंधी तोडगा काढला जावा. परंतु राजकारणात काहीच अशक्य नाही. पंजाबमधील विधानसभा निवडणूक तसेच जालंधर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल पाहता अकाली दल अन् भाजप यांच्यात आघाडी असती तर दोन्ही पक्षांना लाभ झाला असता असा दावा ग्रेवाल यांनी केला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रचंड विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच सत्ता मिळविली आहे. काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहामुळे सत्ता गमवावी लागली. तर भाजप अन् अकाली दलाने आघाडी मोडीत काढून निवडणूक लढविली होती. याचा फटका दोन्ही पक्षांना निवडणुकीत बसला आहे.
प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाची पार्श्वभूमी
माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या निधनानंतर अकाली दल आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढण्याचे संकेत मिळत आहेत. बादल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जगतप्रकाश हे पंजाबमध्ये पोहोचले होते. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू झाल्याचे मानले जात आहे.