भाजपला 103-115 तर काँग्रेस 79-91 जागा मिळण्याचा अंदाज
निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून यापूर्वी काँग्रेसला बहुमत मिळेल, असे राज्यातील काही सर्वेक्षण एजन्सीनी सांगतिले होते. आता दिल्लीतील काही न्यूज चॅनेलच्या सर्व्हेत भाजप आघाडी घेत असल्याचा अंदाच काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या दृष्टीने पुन्हा गेम चेंजर भूमिकेत येऊन राज्यात भाजपची सत्ता स्थापन करून देतील, अशी शक्मयता वर्तविली आहे.
झी न्यूज चॅनेलने राज्यात 1.80 लाख पुरुष व 1.12 लाख महिलांशी बोलून हा सर्व्हे केला आहे. त्यातून आलेला सर्व्हे सोमवारी जाहीर केला आहे. या सर्व्हेनुसार भारतीय जनता पक्षाला 103 ते 115 जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला 79 ते 91 जागांपर्यंत मजल मारता येईल, तर निजदला 26 ते 36 जागा मिळतील. तसेच अपक्ष व इतर पक्षांतील उमेदवारांची संख्या 1 ते 3 इतकीच असणार आहे. यावेळी भाजप 42 टक्के, काँग्रेस 40 टक्के, निजद 15 टक्के आणि इतरांना 3 टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
224 जागा असलेल्या राज्याच्या निवडणुकीत 113 जागा मिळाल्यास बहुमताचा आकडा गाठता येतो. गेल्यावेळी भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस 80 तर निजदला 37 जागा मिळाल्या होत्या. लिंगायतविरोधी हा लेबल काँग्रेसकडून भाजपला लावला जात असला तरी लिंगायत समाजातील मते भाजपला अधिक पडतील, असाही अंदाज या न्यूज चॅनेलने काढला आहे. लिंगायत समाजातील 66 टक्के लोक भाजपला मतदान करतील, असे सर्व्हे सांगत आहे. वक्कलिग समाजाच्या सर्व्हेत 52 टक्के लोक निजदला मतदान करतील, असे आहे. 28 टक्के लोक काँग्रेसला मतदान करतील, असे सांगितले गेले आहे.

मोदी पुन्हा ठरणार गेम चेंजर?
यावेळी कर्नाटकात कुठल्याही प्रकारे सत्ता घ्यायची यासाठी दिल्लीतून सूत्रे हालविली जात आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही कर्नाटकच्या रणांगणात जोरदारपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपला गेम चेंजर म्हणून मोदी यांची मदत होणार असल्याचे मानले जात आहे. मोदींमुळे कर्नाटकात भाजप येईल, असे 44 टक्के लोकांचे मत आहे. 34 टक्के लोकांनी याला भागश: संमती दिली आहे. तर 22 टक्के लोकांनी मोदींमुळे नाही, असे म्हटले आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा परिणाम अधिक होईल, असेही काही मतदारांचे मत आहे.
काँग्रेसची टीका भोवणार
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदी यांना साप म्हटल्याचा परिणाम निवडणुकीवर होणार असल्याचे म्हटले आहे. भाजपला याचा फायदा होणार असे 56 टक्के मतदारांनी म्हटले आहे. तर 32 टक्के मतदारांनी अशाप्रकारामुळे काँग्रेला नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. 12 टक्के मतदारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बोम्माईंना पसंती
सध्या असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्री म्हणून अनेक लोकांनी प्रतिसाद दिला आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण पसंत असल्याच्या प्रश्नावर सिद्धरामय्या, कुमारस्वामी, डी. के. शिवकुमार यांची नावे आहेत. या चार नेत्यांना क्रमाने पसंती मिळाली आहे.
भाजप-निजद युती
एखाद्यावेळेस त्रिशंकू स्थिती झाल्यास राज्यात भाजप व निजदने युतीचे सरकार बनवावे, असे 54 टक्के मतदारांना वाटते. भाजप व निजदची मैत्री स्वीकारणारी टक्केवारी अधिक असून त्याला मतदारांनी कौल दिला असल्याचे झी न्यूज चॅनेलच्या सर्व्हेत आले आहे.









