केपेतील काँग्रेसच्या चेतना यात्रा कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका
वार्ताहर /केपे
ब्रिटिशांनी भारतात फोडा व राज्य करा ही पद्धत वापरली. तीच पद्धत आता भाजप वापरत आहे. त्यामुळे अनेक पक्ष आणले गेले व निवडणुकीत मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला गेला, असे उद्गार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केपे येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित चेतना यात्रा कार्यकमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना काढले. यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, सावियो डायस, कॅप्टन व्हेरियाटो, सुभाष फळदेसाई, अवधुत आमोणकर व इतर हजर होते.
काँग्रेस पक्ष बळकट करायचा असेल, तर पणजीत बसून चालणार नाही. त्याकरिता प्रत्येक गोवेकराच्या घरापर्यंत जाणे गरजेचे आहे. जनतेचे विचार व समस्या जाणून घ्याव्या लागतील. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य गरजेचे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे काँगेस पक्ष उभा आहे व विजयी होत आहे. यामुळे कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्याचा विचार आहे, असे पाटकर यांनी सांगितले. गोवेकर म्हणून अभिमान व स्वाभिमान शाबूत आहे त्याचे श्रेय फक्त काँग्रेस पक्षाला जाते. काँग्रेसमुळेच जनमत कौल झाला, कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला. बाकीचे पक्ष येऊन गोवेकरांकरिता झटत असल्याचे जे दाखवत आहेत तो सर्व देखावा आहे. काँग्रेस हाच सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे, असे ते पुढे म्हणाले.
जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा सरकारला वाघ कसा बाहेरून आला होता हे सिद्ध करण्यात जास्त रस आहे, अशी टीका त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत 67 टक्के मतदान हे सरकारच्या विरोधात झाले आहे. जनतेला सरकारवर राग आहे हे सिद्ध होते. या कार्यक्रमाविषयी सोशल मीडिया व इतर माध्यमांतून अपप्रचार केला जात आहे. मात्र हा कार्यकम करण्यामागचा उद्देश कार्यकर्त्यांना धीर देणे आहे. कार्यकर्त्यांचा विचार अंमलात आणला जाईल. काँग्रेस पक्ष फक्त निवडणूक आली की, सक्रिय होतो अशी लोकाची धारणा होती. तसे नसून येणारी पाचही वर्षे काँग्रेस सक्रिय असेल आणि लोकांचे प्रश्न घेऊन पुढे येईल, असे पाटकर यांनी सागितले .
काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता तळागाळात जाऊन काम करणे तसेच सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्याकरिता काम करणे गरजेचे आहे, असे आमदार डिकॉस्ता यांनी सागितले. काँग्रेसमुळेच देशाचा एवढा विकास होऊ शकला आहे. युवा पिढीला पक्षाचा इतिहास समजावणे गरजेचे आहे, असे फळदेसाई यांनी सागितले.









