ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपुरातील भाजप कार्यकर्त्या सना खान आठवडाभरापासून बेपत्ता आहेत. व्यावसायिक कामानिमित्त त्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे गेल्या होत्या. 1 ऑगस्टपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. व्यावसायिक कामानिमित्त त्या जबलपूरला गेल्या होत्या. मात्र, 1 ऑगस्टपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सना खान बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी मानकापूर पोलिसांत दाखल केली. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल झाले आहे.
सना यांचा व्यावसायिक भागिदार साहू हा तिथून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. साहू याने त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तसे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने मानकापूर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.








