पक्ष कार्यालयाबाहेर परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत महापौरपदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आम आदमी पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते मंगळवारी रस्त्यांवर उतरले. दोन्ह पक्षांनी परस्परांना महापौर निवडणुकीस होत असलेल्या विलंबासाठी जबाबदार ठरविले आहे. महापालिका सभागृहाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत गोंधळामुळे महापौर निवडणूक होऊ शकली नव्हती.
उपराज्यपालांकडून नामनिर्देशित 10 सदस्यांना मतदानाचा अधिकार असल्याचे सभागृहाचे अध्यक्षत्व सांभाळणाऱया सत्य शर्मा यांनी बैठकीत जाहीर केले होते. यानंतर भाजप आणि आपच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते.
दिल्लीत सोमवारी महापौरपदाची निवडणूक तिसऱयांदा टळली होती. यापूर्वॅ 6 आणि 24 जानेवारी रोजी देखील निवडणूक होऊ शकली नव्हती. भाजपने उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना सभागृहाचे सत्र पुन्हा आयोजित करण्यासाठी 10 फेब्रुवारीची तारीख सुचविली होती. तर आपने 3, 4 आणि 6 फेब्रुवारी या तारखा सुचविल्या होत्या. उपराज्यपालांनी आपची सूचना मान्य करत 6 फेब्रुवारी हा दिवस निश्चित केला हाता. परंतु सोमवारीही निवडणूक होऊ न शकल्याने आम आदमी पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप दिल्लीत महापौरपदाची निवडणूक होऊ देऊ इच्छित नाही. भाजप अप्रामाणिक मार्गाने महापालिकेवर शासन करू पाहतोय असा आरोप आप नेत्या आतिशी यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्लीला एक भ्रष्ट मुख्यमंत्री मिळाला असून त्याचे नाव अबकारी घोटाळय़ात समोर आल्याचे म्हटले आहे.









