बोरी पुलाचे भूसंपादन थांबवण्याची मागणी : विविध विषयांवरून राज्यातील ग्रामसभा तापल्या
पणजी : राज्याच्या विविध ग्रामपंचायतींच्या काल रविवारी झालेल्या ग्रामसभांमधून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना लोकांकडून समर्थन व विरोध असे चित्र पाहावयास मिळाले. अडवलपाल ग्रामसभेत खाण व्यवसायास विरोध करण्यात आला तर रिवण ग्रामसभेत प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणारा ठराव घेण्यात आला. लोटली आणि वेरे वाघुर्मे या पंचायतींच्या ग्रामसभेत अनुक्रमे बोरीतील नवीन पूल आणि शितोळे तळ्याच्या प्रकल्पास तीव्र विरोध करण्यात आला. वाघुर्मेतील ग्रामस्थांनी तर जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: हुसकावूनच लावत आपल्या एकतेचे दर्शन घडविले. आतापर्यंत राज्याचा आर्थिक कणा समजला जाणारा व ज्यावर अर्धीअधिक लोकसंख्या अवलंबून असलेला खाण उद्योग आता लोकांना नकोसा झाला आहे. गेल्या कैक दशकांपासून हा व्यवसाय चालत असताना भोगलेले दुष्परिणाम, कित्येक गावे उद्ध्वस्त होण्यासारखी निर्माण झालेली परिस्थिती व आता गेल्या काही वर्षांपासून त्याच्या बंदीच्या काळात दिसून आलेले सकारात्मक बदल यांची तुलना केल्यास यापुढे राज्यात खाण व्यवसाय नकोच अशा मतापर्यंत लोक पोहोचले आहेत. त्याचेच पडसाद रविवारी झालेल्या ग्रामसभांमधून दिसून आले.
अडवलपालला खाणींना विरोधच
सर्वाधिक खाणी असलेल्या डिचोली तालुक्यातीलच अडवलपालच्या ग्रामसभेत खाणींचा विषय प्रकर्षाने चर्चेस आला व त्यात बोलताना काही ग्रामस्थांनी गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नकोच, अशी भूमिका मांडली. अन्य काही ग्रामस्थांनीही या व्यवसायास विरोध करतानाच यापूर्वी या कंपन्यांकडून ग्रामस्थांच्या विरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याची मागणी केली. सरकारने आधी ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावेत, नंतर खाणींचा विचार करू, अशी भूमिका मांडली. सरपंच गजानन पालकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.
आयआयटीचे रिवणात स्वागत
सांगे मतदारसंघात रिवण भागात आयआयटी व्हावी यासाठी प्रयत्न करणारे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रयत्नांना यश येण्यासारखे चित्र रविवारी झालेल्या या पंचायतीच्या ग्रामसभेमधून दिसून आले. या गावात आयआयटी व्हावी यासाठी सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला व आयआयटीचे स्वागत केले. या सभेला स्वत: मंत्री फळदेसाई उपस्थित होते.
पुलासाठी भूसंपादनास लोटलीकरांचा विरोध
बोरी भागात नवीन पूल उभारण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेले भूसंपादन त्वरित थांबवावे अशी जोरदार मागणी करत लोटली ग्रामसभेने या पुलाला तीव्र विरोध केला. या ग्रामसभेलाही प्रचंड गर्दी होती व ग्रामस्थांनी एकमताने पुलासाठी भूसंपादनास विरोध दर्शविला. या प्रश्नी आपण लोकांच्या बाजूनेच असल्याची भूमिका सरपंचांनी स्पष्ट केली. तरीही सरकारने हस्तक्षेप केलाच तर त्याला विरोध करण्याचाही निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
शितोळ तळ्यावरून ग्रामस्थ आक्रमक जलस्रोत अधिकाऱ्यांना पिटाळले
वेरे वाघुर्मे येथील वादग्रस्त ठरलेल्या शितोळ तळ्याच्या प्रकल्पासंबंधी माहिती देण्यास आलेल्या जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पंचायत मंडळालाही ग्रामस्थांनी धारेवर धरले. अशाप्रकारे ग्रामसभा तापल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. या पंचायत क्षेत्रातील भूतखांब केरी पठारावर मोठा जलभक्षक प्रकल्प होऊ घातल्याचा सुगावा नागरिकांना लागला आहे. त्यासाठीच या भागात खांडेपार नदीवर धरण, तळ्याची दुऊस्ती आदी प्रकल्प हाती घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी त्यांची धारणा झाल्यामुळेच नागरिकांनी सदर प्रकल्पांना विरोध सुरू केला असल्याचे वृत्त आहे. ग्रामस्थांचा कडवा विरोध पाहून पंचायत मंडळाने अखेर सदर प्रकल्पच रद्द करण्याबाबतचा ठराव संमत केला. तसेच दुऊस्तीनिमित्त केलेली तळ्याची मोडतोड जैसे थे करण्याची मागणीही ठरावात नमूद करण्यात आली.
राखीवतेतून पेडणे मतदासंघ बाहेर काढा
गोवा विधानसभेसाठी आगामी निवडणूक 2027 मध्ये घेण्यात येणार आहे. तोपर्यंत पेडणे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित केल्यास 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. एवढ्या दीर्घ कालावधीसाठी एकच मतदारसंघ आरक्षित ठेवणे म्हणजे राजकीय आणि सामाजिक असमतोल ठरणार आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मतदारसंघ आरक्षणातून बाहेर काढावा, अशी मागणी धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली व सदर ठराव संमत करण्यात आला.
सर्वण ग्रामसभेत कचरा विषयावर चर्चा
कारापूर सर्वण पंचायतीच्या तासभर चाललेल्या ग्रामसभेत कचरा, मोकाट गुरे, बेवारस श्वान, यासारखे विषय चर्चेस आले. या सभेला लोकांचा अल्प प्रतिसाद लाभला तसेच काही पंचसदस्यही गैरहजर राहिल्याचे दिसून आले.









