वाहनधारकांना धोकादायक : त्वरित दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बिस्किट महादेव मंदिर ते पाईपलाईन रोड दरम्यानच्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना धक्के खात वाहने हाकावी लागत आहेत. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. कॅम्प परिसरातून गेलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेमुळे सौंदर्यालाही बाधा येऊ लागली आहे. कॅम्प परिसर विविध वृक्षांनी नटलेला असला तरी रस्ता मात्र खड्ड्यात हरवला आहे. पूर्णपणे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. पश्चिम भागातून शहरात प्रवेश करणाऱ्या या रस्त्याची वाताहत झाल्याने वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे. याच मार्गावरून तुडये (ता. चंदगड) यासह बेळगुंदी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी, गणेशपूर आदी भागातील नागरिकांची वर्दळ आहे. सकाळी आणि रात्री वाहनांची संख्या अधिक असते. मात्र रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. तर काहीवेळा लहान-सहान अपघातांची मालिकाही सुरू आहे. वाहनधारकांतून धोकादायक बनलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









