सामाजिक बांधिलकीतून विविध ठिकाणी अन्नधान्य साहित्यासह फळे वाटप : अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण
बेळगाव : प्रख्यात उद्योजक व समाजसेवक प्रसन्ना घोटगे यांनी आपली समाजसेवेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत स्वत:चा वाढदिवस विजय मोरे यांच्या शांताई वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सहवासात केक कापून साजरा केला. दिवसाची सुरुवात कुटुंबीयांसह कुलदेवतेचे दर्शन, पूजाविधीने केल्यानंतर मित्र परिवार, प्रतिष्ठित नागरिक व पीव्हीजीच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर समाजसेवी वृत्तीनुसार माऊली वृद्धाश्रम शिंदोळी, अनाथाश्रम खानापूर, सेंटपॉल स्कूल संगरगाळी, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आश्रम शहापूर, चिकुंबीमठ वैभवनगर, बेळगाव, माहेश्वरी अंधशाळा शिवबसवनगर, अनमोल मक्कळधाम संतिबस्तवाड, स्वामी दयानंद विद्याश्रम शांतीनगर, टिळकवाडी अशा विविध ठिकाणी अन्नधान्य साहित्य व फळे वाटप करण्यात आली. त्यानंतर गोव्यातील गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल ऊमड, गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल नानोस, विद्यावर्धिनी स्कूल फॉर चिल्ड्रन्स उसगाव, केशव सेवा साधना स्कूल फॉर चिल्ड्रन्स वाळपई या शाळांमध्ये मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे उद्योजक प्रसन्ना घोटगे हे नेहमीच गरजू विद्यार्थी, शाळा, विविध सामाजिक संघटना, रुग्ण, खेळाडू यांना भरीव आर्थिक मदत करत आलेले आहेत. त्यांच्या या परोपकारी प्रेरणादायी कार्याचे कौतुक राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच जाणकार व प्रतिष्ठित नागरिकांकडून होत आहे.









