आपल्या पोटी धष्टपुष्ट बालक जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु, नुकतेच जन्माला आलेले अर्भक किती मोठे असावे याला काही नैसर्गिक मर्यादा असतेच. आपल्याकडे बाहुबली हा शब्द अलिकडच्या काळात लोकप्रिय झाला आहे. त्याला कारण प्रभास आणि राणा दग्गुबती यांचा ‘बाहुबली’ हा गाजलेला चित्रपट हे आहे. त्यामुळे कोणत्याही दणकट माणसाला आणि अचाट शक्तीची कामे करणाऱ्याला बाहुबली म्हटले जाते.
तथापि, सध्या एका नवजात बालकाचा व्हिडीओ लोकप्रिय झाला आहे. हे अर्भक जन्मत:च आकाराने तर मोठे आहेच. शिवाय जन्म झाल्याबरोबर त्याला जेव्हा नर्सने उलटे केले तेव्हा त्याने चक्क आपल्या दोन्ही हातांनी खालचा ट्रे घट्ट पकडून ठेवल्याचेही या व्हिडीओत दिसून येते. त्याचा हा आचाट कारनामा पाहून ती नर्सही आश्चर्यचकित झाली. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तो खराच आहे का अशी पृच्छाही केली आहे. काही जणांनी या अर्भकाचा असा व्हिडीओ प्रसारित करावयास नको होता असा सूर लागला आहे. तर काही जणांनी तो प्रसारित करणारे डॉक्टर आणि नर्स यांना शिक्षा करावी अशीही सूचना केली आहे. हे अर्भक नेमके कोठे जन्माला आले आहे, याची निश्चित माहिती मिळत नसली तरी हा व्हिडीओ सत्य आहे, याची पडताळणी अनेकांनी केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो दर्शन लाभलेले असून बहुतेक सर्वांनी जन्मत:च इतक्या शक्तीवान अर्भकाला आपण प्रथमच पहात आहोत, अशी टिप्पणी केली आहे.









