माडग्याळ वार्ताहर
माडग्याळ ता. जत येथे आज दुपारी दोनच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असून जन्मदात्या आईचा मुलाने दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी मुलगा सुरेश आण्णाप्पा कोरे यांला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माडग्याळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मयत शांताबाई अण्णाप्पा कोरे वय वर्ष 55 व तिचा एकुलता एक मुलगा सुरेश आण्णाप्पा कोरे लय 37 हे दोघेही होस्पेट गावच्या हद्दीत आपल्या शेतात राहत होते. सुरेशच्या वडीलाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आज दुपारी सुरेश व त्याची आई शांताबाई यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादामुळेच सुरेशने चिडून जाऊन आपल्या आईचा दगडाने ठेचून खून केला आहे. चेहऱ्यावरती डोक्यावर दगडाने वर्मीघाव घातल्यामुळे शांताबाईचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदरची घटना माडग्याळ गावामध्ये समजताच एकच खळबळ उडाली. सुरेश हा आपल्या आई सोबत शेती करून तसेच ट्रॅक्टर चालवून आपली उपजीविका करत होता. तो अविवाहित असून त्याच्यात व आईमध्ये 40 एकर शेती नावावर करण्यासाठी वारंवार वाद होत असत. त्याची आई शांताबाई शेती विकण्याच्या भितीने या गोष्टीस विरोध करत होती. त्यातूनच हा खून झाला. अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.








