एजंटांना बसणार चाप : सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत थांबावे लागणार
बेळगाव : काही नगरसेवक व एजंटांना आवर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील जन्म व मृत्यू दाखले वितरण विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आरोग्य विभागाच्यावतीने कुलूप घालण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दरवाजा बाहेरुन कुलूप घालून बंद करण्यात येत असल्याने जन्म-मृत्यू दाखले वितरण व्यवस्थेला शिस्त लागली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जन्म-मृत्यू दाखल्याचे वितरण केले जाते. त्याठिकाणी अर्ज स्वीकारण्यासह नवीन दाखल्यांचे वितरण केले जाते. यासाठी काउंटर व्यवस्था आहे. तर दाखल्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्व समस्येमुळे जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी नागरिकांना दाखले मिळण्यासाठी वारंवार महापालिकेच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. त्यातच काही नगरसेवक व एजंट थेट जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागात प्रवेश करीत आहेत. त्याठिकाणी गर्दी होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच काही नगरसेवक आपली कामे करून घेण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव घालत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे होण्यास विलंब होत आहेत.
आरोग्य विभागाकडून दाखले वितरणाला शिस्त
ही सर्व बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला शुक्रवार दि. 28 फेब्रुवारीपासून बाहेरुन कुलूप घालण्यास सुरुवात केली आहे. सकाळी 10.30 वा. कुलूप घालण्यात आल्यानंतर दुपारी जेवणासाठी कुलूप उघडण्यात येत आहे. त्यानंतर पुन्हा दुपारी कुलूप घालण्यात आल्यानंतर सायंकाळी दरवाजा उघडला जात आहे. यामुळे कर्मचारीदेखील आत राहून आपले काम व्यवस्थित पार पाडत आहेत. तसेच विविध कामे घेऊन आलेल्यांना आत प्रवेश मिळत नसल्याने रांगेत थांबून कामे करून घ्यावी लागत आहे. आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयाने जन्म-मृत्यू दाखले वितरणाला शिस्त लागल्याचे दिसून येत आहे.









