बेळगाव : महापालिकेतील जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागाला पुन्हा एकदा कुलूप घालण्यात आला आहे. काही नगरसेवक व नागरिक रांगेत थांबून अर्ज करण्याव्यतिरिक्त थेट जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागातच शिरत आहेत. त्यातच अलीकडे कॉम्प्युटर पाडण्यात आल्याने खबरदारी म्हणून विभागाच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप घालण्यात येत आहे. या विभागात अनागोंदी कारभार सुरू असून अर्जदारांना दाखले देण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप होत आहे. जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याला तातडीने मंजुरी देण्याऐवजी 15 दिवसानंतर मंजुरी मिळत आहे.
दुरुस्तीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्यादेखील लक्षणीय आहे. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे या विभागाचे प्रमुख असून त्यांच्याकडून पडताळणी केली जाते. त्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडून मंजुरी मिळते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी कारणे सांगून दाखले देण्यास विलंब केला जात आहे. मात्र नगरसेवक किंवा एजंट थेट विभागात शिरून आपली कामे करून घेत आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अलीकडेच संतप्त नागरिकांनी येथील कॉम्प्युटर पाडवून आपला रोष व्यक्त केला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मुख्य दरवाजाला कुलूप घालण्यात येत आहे. जन्म-मृत्यू दाखले विभागात कर्मचारी सकाळी शिरल्यानंतर दुपारी जेवणासाठी बाहेर पडत आहेत. दुपारी आत गेलेले कर्मचारी सायंकाळी बाहेर पडत आहेत.









