‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी’ ही समर्थ रामदास स्वामी रचित आरती आपण सारेजण मोठय़ा भक्तिभावाने म्हणतो, परंतु त्यातले मर्म लक्षात येतेच असे नाही. त्यातल्या शेवटच्या ओळीत समर्थ म्हणतात, ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’.. ‘स्थूल देहातून प्राण निघताना हे गणराया, तू आमचे रक्षण कऱ’ समर्थ एका अभंगात श्रीरामरायांना म्हणतात, ‘जन्मोनिया तुज भजलो याचि बुद्धी। प्राणत्याग संधी सांभाळीसी।। श्रीरामा तुला निष्कामतेने जन्मभर हृदयाशी धरले आता आशा आहे की ‘अंती रामदासा सांभाळावे’. शेवटच्या क्षणी ज्या गोष्टींचे स्मरण होते त्यातच जीव अडकतो आणि पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात सापडतो म्हणून अंतकाळी परमेश्वराचे नाम मुखात यावे ही संतमंडळींची कळकळ, तळमळ आहे. ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले तो भरत हा विष्णुभक्त होता. गंडकी नदीच्या तीरावर तो सूर्यमंत्राचा जप करत असताना निराधार हरणीच्या पाडसात त्याचा जीव गुंतला आणि परमार्थ राहून गेला. मृत्यूसमयी त्याच्या मनात हरिणीचीच काळजी होती म्हणून अंतकाळी जशी बुद्धी होते तशी पुढील गती प्राप्त होते या न्यायाने त्याला पुढचा जन्म हरिणाचा मिळाला. याउलट पूर्वकर्म दूषित असूनही अंतकाळी नामस्मरण केल्याने अजामिळ उद्धरून गेला. संत एकनाथ महाराजांच्या वाडय़ामध्ये कीर्तन आणि श्रीमद्भागवत ऐकणाऱया गणिकेचा अंतर्बाह्य कायापालट झाला आणि ‘राम कृष्ण हरी’ हा नाथांनी दिलेला मंत्र जपतच तिने प्राण सोडला. अलीकडच्या काळामध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांनी हिरा नामक वेश्येला ज्ञानेश्वर माऊली हा मंत्र देऊन तिचा अंतकाळ सांभाळला, तर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी नरसोबाची वाडी येथील सरस्वतीबाई नामक वेश्येला तिची विरक्ती बघून गुरूस्तोत्र लिहून दिले आणि ध्यानाचाही अभ्यास सांगितला. तिने श्री दत्तप्रभूंच्या नामस्मरणात अयोध्येमध्ये देह ठेवला.
दुर्लभ नरदेहाचे सार्थक व्हावे आणि जन्म-मरणाच्या फेऱयातून माणसाची सुटका व्हावी म्हणून सर्वच संतांनी प्रबोधन केले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आपण आपल्या शरीराशी इतके एकरूप झालो असतो की कोटय़वधी जीव आपला देह इथेच सोडून गेले याची आपल्याला जाणीव होत नाही. रक्तामांसाचे, जाती-धर्माचे, गावाकडचे… असा पसारा मांडून आपण चिरंजीवी थाटात जगत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या–‘सोईरे धाइरे, दिल्याघेतल्याचे। अंत हे काळीचे नाही कोणी। सख्या गोत्र बहिणी। सुखाचे सांगाती। मोकलुनी देती अंतकाळी ।।’ ज्या शरीरावर सर्वात जास्त प्रेम केले ते ‘आपले शरीर आपणा पारखे’ अशी स्थिती होते, म्हणून त्या पांडुरंगाची कास धर. ईश्वराचे दर्शन हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे हा साक्षात्कार त्याला याची देही याची डोळा व्हावा म्हणून ईश्वरसान्नीध्य हा एकच मार्ग आहे असे संत सांगतात. माणूस मात्र नाती-गोती, धनसंपत्ती, स्थावर मालमत्ता यात गुंतून जातो. संत नामदेव महाराज जीवनाचे कटू सत्य सांगताना म्हणतात, ‘अंतकाळी मी परदेशी । ऐसे जाणोनी मानसी । म्हणोनिया ह्रषिकेशी । शरण तुजसी मी आलो ।।’ माझा देह निष्प्राण झाल्यानंतर काय झाले? नऊ मास गर्भवास सोसणारी आई दूर राहिली. बायको, कन्यापुत्र, मित्र गोत्रज सारे सोडून गेले. ‘मी तव जळतसे स्मशानी।अग्नीसवे एकला’ म्हणून विठुराया, तुझ्या चरणी मजला ठाव दे. शेवट गोड झाला म्हणजे मोक्ष मिळतो आणि गर्भवास आणि मृत्यू यातून सुटका होते. तो परमात्म्याशी एकरूप होतो.
‘जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर।’ असे वारंवार मनावर ठसवणारे संत मात्र पुन्हा पुन्हा जन्म घेतात. तो परमात्मा संतांच्या रूपात अवतार घेतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने संस्कृत भाषेतून गीता सांगितली आणि नंतर त्याला काय वाटले कोणास ठाऊक, तोच स्वतः कपडे बदलून ज्ञानेश्वर महाराज म्हणून आला. भगवंताच्या मनातला गीतेचा खरा अर्थ माउलींनी सांगितला. संत जनाबाईंनी संत नामदेव महाराजांचे मूळ संचित सांगितले आहे. त्यांचे आणि स्वतःचे जन्म सांगताना त्या म्हणतात, हिरण्यकश्यपकुळी प्रल्हाद म्हणून नामदेवांचा जन्म झाला तेव्हा मी पद्मिनी नावाची ज्ये÷ दासी होते. दुसऱया जन्मात ते रामभक्त अंगद होते तेव्हा मी मंथरा दासी होते. द्वापारयुगात कृष्णसेवा करणारे नामदेवराय उद्धव होते, तर मी कुब्जा होते तेव्हा श्रीकृष्णाने माझा उद्धार केला. कलियुगात विठ्ठलभक्त म्हणून नामदेव जन्माला आले आणि सेवेसाठी ही जनी नावाची दासी जन्मली. संत तुकाराम महाराज हे संत नामदेवांचा अवतार होते असे संत निळोबा म्हणतात. ‘जगद्गुरू तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथोनिया ।।’ संत एकनाथांच्या आजोबांना साक्षात विठ्ठलाने वर दिला की मी तुझ्या घराण्यात अवतार घेईन. त्याप्रमाणे एकनाथांचा जन्म झाला. संत बहिणाबाईंनी आपला पुत्र विठोबा याला वर्तमान जन्मासह मागील तेरा जन्मांचा इतिहास सांगितला आणि पंढरीचा विठोबा आपल्या उदरी पुत्ररूपाने जन्मला हेही सांगितले. संत रामदास स्वामींचे शिष्य उद्धवचिद् घन श्री रामरायांच्या चरणी प्रार्थना करतात, ‘ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा’. ज्या कुळात श्रीरामांची सेवा झालेली आहे अशा वंशात मला जन्म दे. संत तुकाराम महाराज आपल्या पसायदानात विठ्ठलाकडे मागणे मागतात, ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ आणि ‘तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी’ अशी विठ्ठलाची विनवणी करतात. अलीकडच्या काळात प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना त्यांचे शिष्य वैद्य श्री गणेशपंत सातवळेकर यांनी प्रश्न विचारला, ‘आपणासारख्या महात्म्यांनाही पुनर्जन्म आहे काय?’ यावर प. प. स्वामी म्हणाले, ‘पुनर्जन्म? हो, आहे तर ! हा तर अरुणोदय आहे.’ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेले आहे. सतत चुकत जाणाऱया अज्ञानी जिवांसाठी संतांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. गर्भवास सहन करीत अनेक कष्टांना सामोरे जावे लागते. लोकनिंदा, दारिद्र्य़ आणि एकामागून एक संकटे यांनी सर्व संतांचे जीवन व्यापले आहे. संतांनी जन्म अज्ञानी जिवांसाठी जरी घेतला तरी ते जीवनमुक्त असतात. त्यांच्यात आणि परमात्म्यात अंतर नसल्यामुळे ते ‘मीपणातून’ मुक्त असतात. देहात राहूनच त्यांनी मोक्ष अनुभवलेला आहे. शरीर आणि मायापाश यात न अडकता माणसाने आनंदरूप व्हावे म्हणून संतांनी जीव तोडून प्रबोधन केले आहे. जन्ममरणाचा खरा अर्थ माणसाने समजून घ्यावा यासाठीची संतांची धडपड खरेच आपण समजून घ्यायला हवी.
नेहा शिनखेडे








