हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्टस क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी बिर्ला स्कूलने जैन हेरिटेजचा, वनिता विद्यालयाने शांती निकेतन खानापूरचा पराभव करून विजयी सलामी दिली. मयांक कोलेकर, देवांग चव्हाण यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते आनंद सोमण्णाचे, प्लॅटिनयम ज्युबली मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील, प्रमोद जपे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात जैन हेरिटेजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 112 धावा केल्या. त्यात तेजस गुरवने 2 चौकारांसह 22, अर्णव देसाईने 18 तर आरूष कुंदपने 15 धावा केल्या.
बिर्लातर्फे नरेंद्र, वरूण, मीत, राज व निकिता यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बिर्ला संघाने 19.5 षटकात 6 गडी बाद 113 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. देवांग चव्हाणने 4 चौकारांसह 41, मीत पटेलने 18 तर प्रज्वल पोतदारने 11 धावा केल्या. जैनतर्फे तेजस गुरवने 2, पार्थ मांजरेकर, आरूष कुंदप, सुमधनाने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात वनिता विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 151 धावा केल्या. त्यात मयांक कोलेकरने 7 चौकारांसह 59, समर्थ पांडेने 2 चौकारांसह 42 तर झोया काझी व फयाज काझी यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. शांती निकेतनतर्फे समर्थ पाटीलने 2, राम व संदेश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शांती निकेतन खानापूरचा डाव 18.3 षटकात 77 धावात आटोपला. त्यात राम अल्लाबादीने 2 चौकारांसह 26 धावा केल्या. वनितातर्फे शिवम कांगोलकरने 20 धावांत 3, फराज काझीने 8 धावात 2, झोया काझीने 10 धावात 2, आदी व एwश्वर्या यांनी एक गडी बाद केला.









