मात्र पाचऐवजी तीन चौकांची शिफारस : धर्मवीर संभाजी चौकाला डावलले
बेळगाव : शहरातील प्रमुख पाच चौकांचा विकास आणि देखभाल करण्याची जबाबदारी उचलण्याची तयारी बिर्ला शिक्षण संस्थेने दर्शविली आहे. तसे पत्रही त्यांनी बांधकाम स्थायी समितीकडे दिले आहे. त्यामुळे पाच चौकांऐवजी चन्नम्मा चौक, बसवेश्वर सर्कल आणि आरटीओ सर्कलच्या देखभालीची जबाबदारी संबंधित शिक्षण संस्थेकडे देण्याचा महत्त्वाचा निर्णय शुक्रवारच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला.
शहरातील प्रमुख सर्कल, उद्याने, दुभाजक आदींची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र, काही सेवाभावी संस्था स्वत: पुढाकार घेत उद्याने आणि प्रमुख चौकांचे सुशोभिकरण व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास पुढे येत आहेत. अशाच प्रकारे बिर्ला शिक्षण संस्थेने शहरातील चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, बसवेश्वर सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज सर्कल, सम्राट अशोक सर्कल या चौकांचा विकास आणि देखभाल करण्याची जबाबदारी आपल्याकडे द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. त्यामुळे सदर प्रस्ताव शुक्रवारच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत मांडण्यात आला.
यावेळी चर्चा करून पाच सर्कलऐवजी तीन सर्कल शिक्षण संस्थेला देखभालीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर दुभाजकांच्या देखभालीची जबाबदारी देखील घेणार का? अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली. त्यावर पहिल्यांदा चौकांची जबाबदारी स्वीकारून पुढील वेळी यावर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण संस्थेच्या उपस्थित प्रतिनिधीने बैठकीत सांगितले.
चन्नम्मा सर्कल ते केएलई हॉस्पिटलकडे येणाऱ्या रस्त्यावर अलीकडेच पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, सदर पेव्हर्स व्यवस्थितरित्या बसविण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी वाहने घसरत आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत असून सदर पेव्हर्स काढून पुन्हा व्यवस्थित बसविण्यात यावेत, अशी सूचना अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी केली. पावसाळ्यापूर्वी सदाशिवनगर स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात यावे. त्याचबरोबर महानगरपालिकेची वाहने स्मशानभूमीच्या आवारात उभी न करता गॅरेजमध्ये पार्क केली जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुभाजकांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाल्यास संबंधितांचे जाहिरात फलक त्या ठिकाणी लावण्यास मुभा देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
केंद्राचा नकार…पालिकेचा स्वीकार
स्मार्ट सिटीच्यावतीने शहरात विकासकामे राबविण्यात आली असून त्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. रस्ते, पथदीप, गटारी आदी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे महानगरपालिकेकडूनच शहराच्या विकासासह इतर कामांची देखभाल केली जाणार आहे. देखभालीच्या कामासाठी स्मार्ट सिटीने महानगरपालिकेकडे आठ कोटी रुपयांची ठेव ठेवली असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.









