154 मृत पक्ष्यांना केले दफन, 1150 पक्ष्यांवर केले उपचार
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडला सिटी ब्युटिफुल म्हणून ओळखले जाते. या शहरातील एक व्यक्ती त्याच्या पक्षीप्रेमामुळे देशभरात ओळखला जात आहे. या व्यक्तीचे नाव प्रिन्स मेहरा असून आतापर्यंत हजारो पक्ष्यांवर उपचार केले आहेत.
52 वर्षीय मेहरा यांनी स्वतःच्या सायकलचे एका ऍम्ब्युलन्समध्ये रुपांतर करत ते मागील 11 वर्षांपासून जखमी पक्ष्यांची देखभाल करत आहेत. या कार्यासाठी त्यांना ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. केवळ जखमी पक्ष्यांची देखभाल न करता ते मृत पक्ष्यांना दफन करण्याचेही काम करतात.

मृत पक्ष्यांबद्दल निष्काळजीपणा दाखविणे पर्यावरणासाठी योग्य नाही. हा प्रकार मानव आणि प्राणी दोघांच्याही आरोग्याला धोक्यात आणू शकतो. माझी सायकल पक्ष्यांसाठी ऍम्ब्युलन्सप्रमाणे काम करते, यात सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा आहेत. मी माझी पक्षी ऍम्ब्युलुन्स घेऊन शहरात सर्वत्र फिरतो, जखमी पक्षी आढळल्यावर त्याची देखभाल करतो किंवा त्याला घरी घेऊन येतो. पक्षी गंभीर जखमी असल्यास त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात नेत असल्याचे मेहरा यांनी सांगितले आहे.
मृत पक्ष्यांना खड्डा खोदून दफन करत असल्याचे ते सांगतात. मेहरा यांना अनेक लोक फोन करून मृत किंवा जखमी पक्ष्याबद्दल कळवत असतात. जर एखाद्या मृत पक्ष्याला योग्यप्रकारे दफन केले गेले नसल्यास तो आजार फैलावण्याचे कारण ठरू शकतो असे मेहरा यांनी सांगितले आहे.









