शहरातून कलश मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव हिंदू खाटीक समाजाच्या वतीने शुक्रवारी बिरदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱयाची उधळण करत पारंपरिक धनगरी ढोल वादन करत शहरातून कलश मिरवणूक काढण्यात आली. बेळगावसह जिल्हय़ातील खाटीक बांधव मोठय़ा संख्येने यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात बिरदेव यात्रा होऊ शकली नाही. यावषी कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने मोठय़ा उत्साहात यात्रा झाली. शुक्रवारी सकाळी 8 वा. बिरदेव मूर्तीला महाभिषेक करण्यात आला. बाळकृष्ण कांबळे यांच्या हस्ते अभिषेक झाला. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती झाली. 10 वा. आंबिल कलश मिरवणुकीला सुरूवात झाली. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरापासून भंडाऱयाची उधळण करत बिरदेवाच्या नावाचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. खडेबाजार, शनिवारखूट, काकतीवेस, गणाचारी गल्ली येथून बकरीमंडई येथील बिरदेव मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली.
तीन हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद
दुपारनंतर मंदिर परिसरात महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. 3 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बेळगावसह गोकाक, घटप्रभा, इचलकरंजी, हुक्केरी या परिसरातील खाटीक बांधव उपस्थित होते. अध्यक्ष उदय घोडके, प्रकाश म्हाळगावकर, धनंजय घोडके, सतिश घोडके, दीपक शेतके, आकाश शारबिदे, दामोदर भोसले, माजी नगरसेवक राकेश पलंगे, रोहित घोडके, सुधीर घोडके, सदानंद घोडके यांच्यासह बेळगाव परिसरातील खाटीक बांधव उपस्थित होते.









