सागरतटापासून 50 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, साहाय्यतेसाठी प्रशासन सज्ज
वृत्तसंस्था / गांधीनगर
उग्र स्वरुप धारण केलेले ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ आज गुरुवारी गुजरातच्या सागरतटाला आदळणार आहे. त्यामुळे सौराष्ट्र आणि इतर स्थानांच्या समुद्रतटापासून 50 हजारपेक्षा अधिक लोकांना सावधानतेचा उपाय म्हणून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे.
गुरुवारी संध्याकाळी कोणत्याही वेळी हे चक्रीवादळ सागरतटाला धडक देऊ शकते. गुजरातप्रमाणे मुंबईलाही त्याचा फटका बसू शकतो. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आपत्ती निवारण सज्जतेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
मांडवी ते कराची
या वादळाची व्याप्ती गुजरातमधील मांडवी ते पाकिस्तानातील कराची अशी राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 130 किलोमीटर इतका राहणार आहे. तो 150 किलोमीटर प्रतितास इतका वाढू शकतो. याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये प्रचंड पाऊस होऊ शकतो. मुंबईलाही पावसाचा तडाखा बसू शकतो. गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छ या वादळप्रवण भागांना सर्वाधिक तडाखा बसणार आहे, असे वादळाच्या दिशेवरुन स्पष्ट होत आहे.
तीन जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता
कच्छ, पोरबंदर आणि देवभूमी द्वारका या तीन जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सागरतटाजवळचे भाग सोडण्याचा आदेश देण्यात आला. तसेच येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सागरतटाजवळ जाऊ नये, असा आदेश लागू करण्यात आला आहे. जीवरक्षक नौका आणण्यात आल्या आहेत. सागरतटापासून दूर असणाऱ्या रुग्णालयांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. औषधे आणि अन्नपदार्थ यांचा साठा करुन ठेवण्यात आला आहे.
रेल्वे रद्द, एनडीआरएफ सज्ज
उच्च तीव्रतेच्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सौराष्ट्रमध्ये 96 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 33 रेल्वेंची अंतरे कमी करण्यात आली आहेत. तर 27 गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्तंाr निवारण प्राधिकारणाच्या (एनडीआरएफ) 18 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व बंदरे बंद करण्यात आल्याने कच्छ भागात 10,000 हून अधिक ट्रक्स खोळंबले आहेत. मच्छिमारांना घरीच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.