बेळगाव : रेशनसाठी घेण्यात येणाऱ्या अंगठ्यांच्या ठशांसाठी (बायोमेट्रिक) लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. अंगठ्यांचे ठसे एकीकडे आणि रेशन वितरण दुसरीकडे असा प्रकार पहावयास मिळत आहे. हक्काच्या रेशनासाठी लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे. रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले जातात. आणि त्यानंतर रेशन वितरण केले जाते. मात्र शहरातील एका रेशन दुकानामध्ये अंगठ्यांचे ठसे घेतले जात नाहीत. लाभार्थ्यांना अंगठ्यांचे ठसे देण्यासाठी दुसरीकडे जावे लागत आहे.
त्यातच सर्व्हर आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. दरमहा रेशन वितरणावेळी ही परिस्थिती निर्माण होत आहे. रेशनचे अंगठे एकीकडे आणि रेशन वितरण दुसरीकडे या प्रकारामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि महिलांची हेळसांड होताना दिसत आहे. रेशन वितरणातील हा विस्कळीतपणा दूर करून अंगठ्यांचे ठसे आणि रेशन वितरण एकाच ठिकाणी करावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. फेब्रुवारीपासून माणसी 10 किलो धान्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांवरही अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. त्यातच सर्व्हर आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे रेशन वितरणास विलंब होऊ लागला आहे. त्यातच काही रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रीकचे काम सुरळीतपणे चालत नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. दरमहा वाढीव रेशन मिळत असले तरी रेशन वितरणातील घोळ मात्र संपताना दिसत नाही.









