सांगली :
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना बायामेट्रिक हजेरी आणि फेस रिडींग करावे लागणार आहे. काम चुकवेगिरीला आळा बसणारा आहे. शिवाय या नोंदणीनुसार महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे, त्यामुळे वेळेत हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारालाही कात्री लागणार आहे.
जिल्ह्यात ७४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७० उपकेंद्र आहेत. या केंद्रांच्या मदतीने ग्रामीण भागातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. स्मार्ट पीएचसी’ यामुळे अनेक आरोग्य केंद्रांचा कायापालट झाला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीच्या ठिकाणी सकाळी १० वाजता हजर असणे बंधनकारक आहे. अनेक कर्मचारी नियमांचे पालन करतात. मात्र अनेकजण काम करत असल्याचा आव आणत इतर ‘उद्योग’ करत फिरत असतात. काही गावात वैद्यकीय अधिकारी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
फेस रिडींगुळे सर्व गोष्टींना चाप बसणार आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता वेळेत हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता लगाम लागण्याची आशा आहे.








