Kolhapur : राजेशाहीत लोकशाहीचे बीजारोपन करणारे, सामाजिक समतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आग्रह धरत कृती करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र आणि विचार आजवर विविध देशी, विदेशी भाषात पुस्तक, ग्रंथरूपाने पोहचले आहेत. आता रशियन आणि इटालियन भाषेतही राजर्षी शाहू महाराजांचे दर्शन घडणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून रशियन आणि इटालियन भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन येत्या 6 मे रोजी शिवाजी विद्यापीठात होणार आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, कर्तृत्व, विचार पुस्तक, ग्रंथांच्या माध्यमातून सर्वदूर पोहचविण्याचे कार्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे. शाहूकार्याला वाहून घेतलेल्या डॉ. पवार यांनी स्वत: महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना करून त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्यासह इतिहासातील इतर महान व्यक्तीमत्वांवर पुस्तक, ग्रंथांचे लेखन, संपादन आणि प्रकाशन केले आहे. राजर्षी शाहू महाराजांवर त्रिखंडात्मक शाहू स्मारक ग्रंथ, अभियानातर्गंत घरोघरी शाहू, पंचखंडात्मक शाहू चरित्र ग्रंथ मराठी भाषेत प्रकाशित केले आहेत. त्याच बरोबरीने हिंदी, कोंकणी, तेलगू, उर्दू, गुजराती या देशी भाषेतही शाहू चरित्र पोहचविले आहे. विदेशी भाषेत इंग्रजी पाठोपाठ जर्मन भाषेत शाहूंचे चरित्र विचार पोहचविण्याच कार्यही डॉ. पवार यांनी केले आहे. देश आणि विदेशातील मिळून 25 भाषात शाहू चरित्र पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानी, रशियन आणि इटालियन भाषेत शाहूंवरील पुस्तक तयार करण्याचे काम सुरू झाले. सध्या जपानी भाषेतील पुस्तकाचे काम सुरू आहे. तर रशियन आणि इटालियन भाषेतील पुस्तक पूर्ण झाले असून त्याचे प्रकाशन येत्या 6 मे रोजी शिवाजी विद्यापीठात होणार आहे.
शाहूंवरील रशियन भाषेतील पुस्तकातील लेखन शिवाजी विद्यापीठातील रशियन विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे आणि रशियातील तत्याना बिकावा यांनी केले आहे. इटालियन भाषेतील शाहूंवरील पुस्तकातील लेखन प्रोफेसर अलेसांड्रा कॉनसो लारो यांनी केले आहे. लारा या रशियातील तुरीन विद्यापीठात हिंदी भाषेच्या प्रोफेसर आहेत. या सर्वांना डॉ. जयसिंगराव पवार यांनी मार्गदर्शन केले आहे, तर प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांनी सहकार्य केले आहे.
शाहू स्मृती शताब्दी दिनी 6 मे रोजी प्रकाशन
राजर्षी शाहू महाराजांवरील रशियन आणि इटालियन भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन येत्या 6 मे रोजी शाहूंच्या पुण्यतिथी दिनी करण्यात येणार आहे. या दिवशी शाहू स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आहे. त्याचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन कार्यक्रम होणार आहे. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, विचारवंत सुरेश व्दादशीवार, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित राहणार आहेत.
रशिया आणि इटली या देशातील नागरिकांनी यापूर्वी अनियंत्रण राजेशाही, हुकूमशाही पाहिली आहे. अशा देशातील नागरिकांना राजेशाहीत लोकशाही नांदविणारा राजा राजर्षी शाहू महाराजांच्या रूपाने भारतात झाला आहे, हे या पुस्तकाच्या रूपाने कळणार आहे. त्यांचे सामाजिक समता, राष्ट्रीय एकत्मता आणि धर्मनिरपेक्षतेचे विचारही या दोन्ही देशात पोहचण्यास मदत होणार आहे.
-डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









