कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठात पश्चिम घाटातील दोन हजारपेक्षा जास्त वनस्पती असून त्यामध्ये 250 दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. असे असले तरी 2025 मध्ये अत्याधुनिक नर्सिरीच्या माध्यमातून दुर्मिळ देशी वानांसह जैवविविधता संवर्धन करण्याचा मानस आहे. सुतार विहिर परिसरात तयार करण्यात येणाऱ्या अत्याधीनिक नर्सरीमध्ये ग्रीन हाऊस, शोभावंत फुले, देशी फुल, उद्यान शेती, फॉरेस्टसाठी आवश्यक रोपांची निर्मिती केली जाणार आहे. खर्च सव्वाकोटीपेक्षा जास्त खर्च आहे.
शिवाजी विद्यापीठातील उद्यान विभागात पुर्वीपासूनच 40 प्रकारची झाडे आहेत. तर गुलाब, जाई–जुई, मोगरा यासह वेलवर्गीय फुलांच्या वेलींनी उद्यान विभाग फुलला आहे. 2025 मध्ये होणाऱ्या अत्याधुनिक नर्सरीमध्ये पश्चिम घाटातील सर्व औषधी वनस्पती लावण्यात येणार आहेत. त्याची रोपे व बिया तयार करून मापक दरात शेतकऱ्यांसह मागेल त्याला विक्री केली जाईल. सर्व प्रकारची रोप आणि ज्या बिया लवकर उगवून येण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली जाईल. तसेच फांद्यांपासून तयार होणाऱ्या रोपांना कलम करून रोपे तयार केली जाणार आहेत. या नर्सरीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त वानांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त देशी झाड, वनस्पती, फळ, फुलांचा समावेश असेल. सध्या बिमोड होत चाललेली देशी झाडांची निर्मिती करून संवर्धन केले जाईल. जैवविविधता संवर्धनात शिवाजी विद्यापीठ पहिल्यापासूनच राज्यात एक नंबर आहे. विद्यापीठ परिसरात झाडे, सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी मोठया प्रमाणात आहेत. उद्यान विभाग, पिण्याच्या पाण्याची टाकी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर आणि गुलाबाची बाग विविध प्रकारच्या फुलांनी फुलली आहे. पॉलिहाऊस तयार केले जाणार असून, बिया किंवा फांद्या घेवून बियांची निर्मिती करून त्याची विक्री केली जाणार आहे. या वनस्पती निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध ठिकाणांची नियुक्ती केली आहे. शिवाजी विद्यापीठात 10 विहिरी, दोन मोठी तळी अन 24 शेततळी 24 आहेत. त्यामुळे विद्यापीठात स्वत:चा पाणीपुरवठा असल्याने प्रस्तावित नर्सरीला पाणी कमी पडणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणने आहे.
उद्यान विभागाची सर्टीफिकेट कोर्स
शिवाजी विद्यापीठात उद्यान विभागाचा सर्टीफिकेट कोर्स आहे. या कोर्समार्फत गार्डन विभागाला लागणारे पूरक मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. त्यामुळे अत्याधुनि उद्यान विभाग व्यवस्थित फुलवला जाणार आहे.
बोटॅनिकल गार्डन
बोटॅनिकल गार्डनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 1200 वनस्पती आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वनस्पती पाहण्यासाठी शालेय सहलींसह राज्यभरातील संशोधक येतात. बोटॅनिकल गार्डनमधील वनस्पतींमध्ये भारतीय वनस्पतींसह परदेशी वनस्पतीही आहेत. वनस्पतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी येथील वनस्पतींवर संशोधन करून औषध तयार केली आहेत. यामध्ये वाढत्या कॅन्सरवर सगळ्यात महत्वाचे संशोधन करून औषध निर्मिती केली आहे.
देशी–विदेशी वाणांची लागवड
शेतीसाठी देशी वानांच्या वनस्पतींचा वापर करावा. तर गार्डन किंवा घराच्या भोवती विदेशी वनस्पतींचा वापर केला जातो. केशर, हापूस, देशी आंबा, नारळ, साग, चिंच, जांभाळ अशा 40 प्रकारच्या वनस्पतीं व्यतिरिक्त अन्य वनस्पती लावल्या जाणार आहेत.
प्रकल्प पथदर्शक ठरेल
शिवाजी विद्यापीठात देशी वानांची लागवड व्हावी यादृष्टीने विद्यापीठातील हा प्रकल्प पथदर्शक ठरेल. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक वाणांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)








