मालवण | प्रतिनिधी :
मालवण एसटी स्थानक परिसरात नव्या इमारतीचे काम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्वच्छता गृहाची दुरावस्था झाल्याने समस्या निर्माण झाली होती. स्वच्छता गृहाची सोय नसल्याबद्दल प्रवासी वर्ग व नागरिकांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे तक्रारी मांडल्यानंतर मालवण शहर भाजपच्या वतीने मालवण आगार व मालवण नगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून मालवण नगरपालिकेने बस स्थानक परिसरात बायोटॉयलेट उपलब्ध करून दिले आहे, अशी माहीती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
मालवण बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम गेली काही वर्षे सुरु असून या दरम्यान बस स्थानक परिसरात स्वच्छता गृहाची योग्य सोय नसल्याने महिला व प्रवासी वर्गाची गैरसोय होत होती. विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान याबाबत प्रवासी वर्गाने खास. नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण आगाराच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आगाराने मालवण नगरपालिकेकडे असणारे बायोटॉयलेट तात्पुरत्या स्वरूपावर देण्यासाठी मागणी करावी असे सांगितले होते. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचेही लक्ष वेधून बायोटॉयलेट देण्याची मागणी केली. या पाठपुराव्यानंतर मालवण नगरपालिकेने बस स्थानकासाठी बायोटॉयलेट उपलब्ध करून दिले असून भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते आगाराला सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, पूजा वेरलकर, आबा हडकर, राणी पराडकर, उत्तम पेडणेकर, किशोर खानोलकर, श्री. केळूसकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी मालवण आगारात उपस्थितीत असलेले एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या बायोटॉयलेटच्या देखभाल व स्वच्छतेकडे आगाराने लक्ष द्यावे अशी मागणी केली. तसेच मालवण बस स्थानकाच्या इमारतीला पर्यटनाची प्रतिमा देण्यात यावी, तसा कलर लूक द्यावा. तसेच या इमारतीमध्ये पर्यटन माहिती केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणीही केली.









