वृत्तसंस्था/ अहमदाबाद
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱया आगामी टी-20 मालिकेत बायो बबल्सची सक्ती राहणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
भारतामध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर क्रिकेटपटूंना विविध स्पर्धांसाठी बायो बबल्सची सक्ती करण्यात आली होती. यामुळे क्रिकेटपटूंना मानसिक थकवा जाणवत होता. दरम्यान बऱयाच क्रिकेटपटूंनी शेवटच्याक्षणी स्पर्धेतून माघार घेतली होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवेळी विविध संघांच्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आली असून हे क्रिकेटपटू या स्पर्धेचा पुरेपूर आनंद उपभोगत आहेत. त्यांच्यावर कोणतीच सक्ती करण्यात आलेली नाही. मध्यंतरी दिल्ली कॅपिटल्स संघातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती पण आम्ही दिल्लीचा सामना पुणे ऐवजी मुंबईत खेळविण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली संघातील कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे, असे शहा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. आयपीएल स्पर्धेतील संपूर्ण साखळी फेरीतील सुमारे 70 सामने मुंबई आणि पुणे येथे बीसीसीआयने महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या मदतीने भरविले. या दोन्ही क्रिकेट संघटनांचे शहा यांनी कौतुक केले आहे.