ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Bindas Kavya disappear by himself to increase followers औरंगाबादची प्रसिद्ध यूटय़ूबर बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पोलिसांना मध्य प्रदेशातील इटारसी येथे ती सापडल्यानंतर तिला कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी फॅन फॉलोअर्स वाढविण्यासाठी हा बनाव रचल्याचे समोर आले आहे.
9 सप्टेंबरला काव्या अचानक घरातून गायब झाल्याचे तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलिसात दिली होती. तिचा फोनही घरी विसरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. तिच्या आई-वडिलांनी तिचा लॉक असलेला फोन उघडून त्यामध्ये व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर भावनिक साद घातली होती. पोलिसांना ही काव्या मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्टेशनवर सापडली. त्यावेळी आई-वडिलांवर नाराज होऊन घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पण यामागचं सत्य वेगळचं असल्याचं आता समोर आलं आहे.
अधिक वाचा : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला जामीन
काव्याचे विविध समाजमाध्यमांवर पाच मिलियनहून अधिक फॅन फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स आणखी वाढावेत, यासाठी तिच्या आई-वडिलांनीच हा खटाटोप केला होता. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता. दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं, हे योग्य नव्हतं. काव्याच्या आई-वडिलांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा ऍड. आशा शेरखाने-कटके यांनी सांगितले.