सध्या ज्या वेगाने जग विविध डिजिटल गोष्टींकडे वाटचाल करत आहे, ते पाहून कधी कधी युवापिढीबाबत चिंता वाटू लागते. रोजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजणच दैनंदिन जीवनातील बाबींच्या पलीकडे एक वेगळे, शांत, आत्म-समाधानी जग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तणाव वाढला की त्यावर मात करण्याचे उपाय प्रत्येकजण आपापल्या परीनं शोधत असतो. एका संशोधनाच्या आधारे असंही आढळून आलं आहे, की अनेकदा तणावातून मुक्त होण्यासाठी ते एखादी नशा करतात किंवा यासाठी अनेक लोक अंमली पदार्थांचा आधार घेतात. हळूहळू ती व्यक्ती त्याच्याही नकळत याच्या आहारी जातात. नशेसाठी घेतली जाणारी दारू असो वा कोकेन, भांग, चरस गांजा, एसएसडी सारखे पदार्थ असोत, या नशेचं एक वेगळंच जग असतं.
आता या बदलत्या युगात अंमली पदार्थांच्या व्यसनाचा टेंडही बदलला आहे. आजकाल लोक डिजिटल ड्रग्स (Digital Drugs) घेऊ लागले आहेत. म्हणजेच दारू, कोकेन, भांग, चरस, गांजा आणि एलएसडी यांसारख्या मादक पदार्थांवरही ऑनलाइन पर्याय ‘बायनॉरल बीट्स’ समोर आला आहे.
बायनॉरल बीट्स ः हे ह्या डिजिटल नशेचे नाव. खरे तर हे बीट्स म्युझिक थेरेपी किंवा म्युझिक मेडीटेशनसाठी उपयुक्त आहे. मात्र सध्या हे नशा करण्याचे साधन होत चालले आहे. साधारण 1893 मध्ये हेनरिक विल्हेल्म डोव्हने ‘बायनॉरल बीट्स’ चा शोध लावला होता. त्यावेळी तो विज्ञान जगतात आवडीचा विषय बनला होता. यानंतर गेराल्ट ऑस्टर यांनी 1973 मध्ये सायंटिफिक अमेरिकनमध्ये ‘ऑडिटरी बीट्स इन द ब्रिटन’ नावाचा लेख लिहिला, यामध्ये त्यांनी बायनॉरल बीट्सबद्दल बरीच नवीन माहिती दिली.
हे बिट्स नक्की काय करतात. ‘बायनॉरल बीट्स’ ही दोन शब्दांनी बनलेली संकल्पना आहे. यामध्ये बायनॉरल म्हणजे दोन कान आणि बीट्स म्हणजे आवाज. हे बायनॉरल बीट म्हणजे मेंदूमध्ये निर्माण केलेला भ्रम, जो एकाच वेळी थोडय़ा वेगळय़ा आवाजाच्या फ्रिक्वेन्सीसह दोन टोन ऐकले जातात.
आपला मेंदू दोन स्वरांचा एक स्वर म्हणून ऐकत असतो. दोन आवाज (स्वर) आपल्या मेंदूच्या लहरिंशी एकरुप होऊन वेगळय़ा फ्रिक्वेंसी बीट तयार करतात. हेडफोन्सशिवाय जर थोडय़ा वेगळय़ा फ्रिक्वेन्सी वाजवल्या तर तो एकच टोन ऐकला जातो. मात्र हेडफोनद्वारे, असे दोन टोन वेगळे केले जातात आणि ऐकणारा प्रत्येक फ्रिक्वेंसी वेगळी कानात स्पष्टपणे ऐकतो. ह्यालाच बायनॉरल बिट्स असे म्हणतात.
मेंदू आपल्याकडे आलेले इलेक्ट्रिक सिग्नल तालबद्ध स्वर म्हणून ऐकतो. इलेक्ट्रिकल सिग्नलला (इम्पल्स) हेतुपुरस्सर नियंत्रण करणे आणि ऐकणाऱयाच्या मेंदूला त्या लहरी संक्रमित करुन उत्तेजित करणे हा डिजिटल ड्रग्सचा उद्देश आहे. हे सिंक्रोनाइझेशन, एका विशिष्ट फ्रिक्वेंसीच्या पातळीमध्ये बायनॉरल टोन निवडून साध्य केले जाते. याला फ्रिक्वेन्सी फॉलोइंग रिस्पॉन्स (FFF) असे म्हणतात. हा एन्टेनमेंट नावाच्या संकल्पनेचा भाग आहे. अर्थात ह्या बायनॉरल फ्रिक्वेंसीज अनेक प्रकारच्या ध्यान आणि वैद्यकीय बायो-फिडबॅकसाठी पण वापरले जातात.
डिजिटल ड्रग्सना साउंड हीलिंग, सोलफेजीओ फ्रिक्वेंसी थेरपी आणि अलीकडे आय-डोसिंग म्हणूनही ओळखले जाते. ‘i’ अक्षराचा अर्थ इंटरनेट आहे — बायनॉरल बीट्स हे इंटरनेटवर शोधून अगदी सहजपणे मिळू शकतात.
आवाज हा फ्रिक्वेन्सी हर्ट्झ (Hz) नावाच्या युनिटमध्ये मोजला जातो. श्रोता विशिष्ट मूड किंवा ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी दोन विशिष्ट हर्ट्झचे स्वर ऐकतो. उदाहरणार्थ, जर खूप रिलॅक्स व्हायचे असेल, तर एका कानात 140Hz आणि दुसऱया कानात 145Hz असलेला स्वर वापरला जाऊ शकतो. जर खुप उत्साही व्हायचे असेल तर एका कानात 130Hz आणि दुसऱया कानात 150 Hz ऐकले जाते. फ्रिक्वेन्सीमधील हे फरक मनाची वेगळी स्थिती निर्माण करतात.
बायनॉरल बीट्स हे पाच प्रकारचे आहेत, जे वेगवेगळय़ा प्रकारच्या ध्वनी लहरिंसह मेंदूच्या वेगवेगळय़ा भागांना सक्रिय किंवा शांत करतात. यापैकी पहिले डेल्टा बायनॉरल बीट्स आहे. यामध्ये, बीट्सची वारंवारता 0.5-4 Hz पर्यंत असते. हे ऐकून गाढ झोप लागते. मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होते. सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचे प्रमाण वाढते. याच्या मदतीने आपण अवचेतन मनाशी (Subconscious Mind) पर्यंत पोचू शकतो.
बायनॉरल बीट्सच्या वाढत्या टेंडनंतर, त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. याबाबत ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यू जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. बायनॉरल बीट्सचा वापर करणारे 5.3 टक्के लोक आहेत, तसेच युनायटेड स्टेट्स, मेक्सीको, ब्राझील, पोलंड, रोमानिया आणि युनायटेड किंगडममध्ये याचा सर्वाधिक दर आहे. अभ्यास करताना असे लक्षात आले की सामान्यतः बायनॉरल बीट्सचा वापर ‘आराम करण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी’ आणि ‘मूड बदलण्यासाठी’ तर काहींकडून ‘इतर औषधांप्रमाणेच परिणाम मिळवण्यासाठी केला जात आहे. थोडक्मयात असे लक्षात आले आहे की 34.7 टक्के व्यक्ती आपला मूड बदलावा म्हणून तर 11.7 टक्के व्यक्ती नशिल्या पदार्थाच्या सेवनाचा आनंद मिळावा यासाठी बायनॉरल बीट्स ऐकत आहेत.
इंटरनेटच्या आधारे केली जाणारी ही नशा अधिक घातक ठरणारी आहे असे जगभरातल्या अनेक मानसोपचार तज्ञांनी मत नोंदवलेले आहे. सातत्यानं हे बायनॉरल बीट्स ऐकल्याने तंद्री लागते व ते वारंवार ऐकावेसे वाटते. अर्थात या ‘डिजिटल ड्रग्स’चा शारिरिक आणि मानसिक परिणाम काय होत असतो यावर जगाचे संशोधन सुरू आहे. मात्र याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं व्यसन हे शेवटी वाईटच.
-विनायक राजाध्यक्ष