वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जगातील दिग्गज गुंतवणूकदार, अब्जाधीश वॉरेन बफे यांनी भारतात गुंतवणुकीबाबत सकारात्मक आशावाद व्यक्त केला आहे. भारतामध्ये गुंतवणुकीसाठी खूप साऱ्या संधी असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले आहे.
अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी बर्कशायर हॅथवे यांचे ते सहसंस्थापक, चेअरमन आणि सीईओ आहेत. बर्कशायर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना त्यांनी भारतामध्ये गुंतवणुकीबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी खूप साऱ्या संधी असल्याचे त्यांनी सांगत भविष्यामध्ये या देशावर लक्ष केंद्रित करायला हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले. आगामी काळामध्ये बर्कशायरसुद्धा शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करू शकते, असेही संकेत त्यांनी दिले.
अमेरिकेतील हेज फंड संबंधित सल्लागार राजीव अग्रवाल यावेळी म्हणाले गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजार हा चांगले प्रदर्शन करत आला आहे. यासोबतच भारत आज जगाच्या यादीमध्ये पाचवा सर्वात मोठा मजबूत अर्थव्यवस्थेचा देश म्हणून गणला जातो. पुढील काही वर्षांमध्येच भारत हा या यादीमध्ये तिसऱ्या नंबरवर पोहोचणार आहे. भविष्य उज्ज्वल असल्याने या देशात गुंतवणूकीची संधी नक्कीच आजमावता येणार असल्याचे ते म्हणाले आहेत.









