कोणत्या घटनेमुळे कोणाचे भाग्य फळफळेल हे सांगता येणे कठीण आहे. ब्रिटनमधील क्रॅम हॅमी यांना नुकताच असा अनुभव आला आहे. ते काही दिवसांपूर्वी सहज म्हणून घरातून बर्गर खाण्यासाठी बाहेर पडले. बर्गर विकत घेताना त्यांच्या दृष्टीला एक लॉटरीची जाहिरात पडली आणि त्यांचे भाग्य पालटले. लॉटरीची तिकीटे काढून आपल्या भाग्याची परीक्षा पाहणारे अनेकजण असतात. पण ती लागते अत्यल्प लोकांनाच. हॅमी हे त्या भाग्यवंतांपैकी एक निघाले.
हॅमी हे ब्रिटनमधील कॉर्नवॉलचे रहिवासी आहेत. बर्गर खाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या हॅमी यांनी एका खाद्यपेय गृहात जाऊन बर्गरची ऑर्डर दिली. बर्गर मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने त्यांनी वेळ घालविण्यासाठी म्हणून तेथून जवळच असणाऱ्या एका स्टॉलवरुन लॉटरीचे स्क्रॅचकार्ड खरेदी केले. ही कृती त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून केली होती. पण याच कृतीने आपण चक्क कोट्याधीश होणार आहोत, याची त्यांना त्यावेळी कल्पनाही आली नाही. काही वेळाने बर्गर वगैरे खाऊन झाल्यानंतर हे लॉटरी कार्ड स्क्रॅच केले. त्यांना तब्बल 10 लाख पौंडाची लॉटरी लागली होती.
10 लाख पौंडांची भारतीय रुपयांमध्ये किंमत होते 11 कोटी 26 लाख रुपये. हॅमी हे 36 वर्षांचे असून चार अपत्यांचे पिता आहेत. ते आपल्या भावासमवेत कुटुंबाचा स्टोरेज सिस्टिम्स विकण्याचा व्यवसाय करतात. आपल्याला लॉटरी लागली आहे, हे लक्षात येताच ते आनंदित होण्याऐवजी चिंतीत झाले. आपले तिकीटे कोठेतरी हरवेल या भीतीने त्यांना पछाडले होते, असा अनुभव ते कथन करतात. ही भीती इतकी वाढली, की त्यांनी ते तिकीट आपल्या हाताला चिकटवूनच घेतले, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, तिकीट हाताला फार काळ चिकवटून ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी ते किचन कॅबिनेटमधील सॉसपॅनमध्ये ठेवले. शेवटी या लॉटरी चालविणाऱ्या कंपनीकडून या तिकिटाची पडताळणी होऊन रक्कम त्यांच्या नावे जमा झाली, तेव्हा कोठे त्यांचा जीव भांड्यात पडला. खरे तर त्यांना लॉटरी लागली आहे, यावर प्रथम त्यांच्या पत्नीचाही विश्वास बसला नव्हता. ते चेष्टा करताहेत असे तिला वाटले होते. पण आता हे कुटुंब चांगलेच आनंदात आहे.









