वृत्तसंस्था / बेंगळूर
जागतिक टेनिस क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी बिली जीन किंग चषक महिला सांघिक टेनिस स्पर्धेचे यजमानपद बेंगळूर भूषवित आहे. बेंगळूरमधील एस.एम.कृष्णा टेनिस स्टेडियममध्ये बिली जीन किंग चषक प्ले ऑफ स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेला भूषविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत 21 देशांचे टेनिसपटू सहभागी होणार असून ते 7 गटात विभागण्यात येतील. प्रत्येक गटामध्ये तीन संघांचा समावेश राहिल.
लंडनमध्ये या स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवार काढण्यात आला. बेंगळूरमध्ये सदर स्पर्धा 14, 15 आणि 16 नोव्हेंबरदरम्यान (तीन दिवस) भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताने अलिकडेच प्ले ऑफ साठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत दोनवेळा पात्रता सिद्ध केली आहे. पुण्यामध्ये अलिकडेच झालेल्या आशिया, ओसेनिया गट 1 मधील लढतीत भारताने कोरियाचा 2-1 असा पराभव केला. बेंगळूरमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेत यजमान भारताचा ग गटात समावेश असून या गटात स्लोव्हेनिया व नेदरलँड्स यांचा सहभाग आहे. भारतीय संघामध्ये अंकिता रैना, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली भामीदीपती, वैदेही चौधरी आणि प्रार्थना ठोंबरे यांचा समावेश राहिल. अ गटामध्ये कॅनडा, मेक्सीको, डेन्मार्क, ब गटामध्ये पोलंड, न्यूझीलंड, रोमानिया, क गटामध्ये स्लोव्हाकिया, स्वीस आणि अर्जेंटिना, ड गटामध्ये झेक, कोलंबिया आणि क्रोएशिया, इ गटात ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल व ब्राझील, फ गटात जर्मनी, बेल्जियम आणि तुर्की यांचा समावेश आहे.









