करार संपल्याने कंपनीने थांबवले काम, आलेले नागरिक पुन्हा माघारी
बेळगाव : शहरात विजेचे बिल भरण्यासाठी हेस्कॉमची एटीपी सेवा उपलब्ध होती. परंतु करार संपल्याने कंपनीने बिल भरणा सेंटर बंद केली आहेत. शहरातील आठ एटीपी सेंटर बंद असल्यामुळे बिल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. एटीपी सेवा मागील दोन दिवसापासून बंद असल्याने हेस्कॉमने तात्पुरत्या स्वरूपात बिलिंग काउंटरची संख्या वाढवली आहे. नागरिकांना वेळेत तसेच लवकर बिल भरता यावे यासाठी हेस्कॉमने दहा वर्षांपूर्वी एटीपीची व्यवस्था केली होती. विजेचे बिल अथवा धनादेश दिल्यानंतर त्वरित बिल भरले जात होते. बेळगाव शहरांमध्ये नेहरूनगर, रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय, उद्यमबाग, शहापूर, गोवा वेस, खासबाग व खंजर गल्ली या ठिकाणी एटीपीची व्यवस्था होती. 30 एप्रिलपर्यंत कंपनीचा करार होता. परंतु कराराचे नूतनीकरण न झाल्याने कंपनीने आपल्या सेवा थांबवल्या आहेत.
ऑनलाईन बिल भरण्याचे आवाहन
सध्या एटीपी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांनी एकतर हेस्कॉम कार्यालयात जाऊन विजेचे बिल भरावे. अन्यथा फोन पे गुगल पे पेटीएम यासारख्या ऑनलाईन सेवेद्वारे बिल भरावे. ज्या नागरिकांना बेळगाव वन कर्नाटक वन कार्यालयात जाऊन बिल भरणे शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी विजेचे बिल भरावे असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.
ऑनलाईन वीज बिल भरण्याकडे नागरिकांचा कल
करार संपल्यामुळे शहरातील एटीपी सेंटरची सेवा बंद आहे. ऑनलाईन वीज बिल भरण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. नागरिकांनी फोन पे, गुगल पे, पेटीएम यासह बेळगाव कार्यालयात विज बिल भरू शकतात.
-ए. एम. शिंदे साहाय्यक कार्यकारी अभियंता









