कोरोना प्रतिबंध आणि लसीकरणाबाबत कौतुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी आरोग्य, हवामान बदल, जी-20 अध्यक्षपदासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. गेट्स यांनी भारतीय कोरोना लस आणि आरोग्य सेवा प्रणालीचे कौतुक केले आहे. तसेच ई-पेमेंट प्रणाली, नवतंत्रज्ञान आदी मुद्दय़ांवरही भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. प्रभावी, सुरक्षित आणि परवडणारी कोरोना लस बनवण्याची भारताची अद्भुत क्षमता प्रशंसनीय आहे. या लसींनी लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि इतर आजारांना जगभरात पसरण्यापासून रोखले. गेट्स फाऊंडेशनही काही लसी बनवण्यासाठी भारताला सहकार्य करू शकले याचे आम्हाला समाधान आहे, असेही गेट्स म्हणाले.
बिल गेट्स यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग ‘गेट्सनोट्स’मध्ये या बैठकीबद्दल माहिती देत भारताचे कौतुक केले. ‘मी सध्या भारतात आहे. ज्यावेळी जग अनेक आव्हानांनी वेढलेले आहे, अशा वेळी भारतासारख्या गतिमान आणि सर्जनशील ठिकाणी राहणे प्रेरणादायी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नवोपक्रमात गुंतवणूक करते तेव्हा काय शक्मय आहे हे भारत जगाला दाखवत आहे. आरोग्य, विकास आणि हवामान बदल क्षेत्रातील भारताच्या वाढीबद्दल मी नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक आहे’ असे गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.









