वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला एम. त्रिवेदी यांनी अंग काढून घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी होणार असलेली या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी आता नव्या खंडपीठासमोर केली जाईल. ती केव्हा होणार यासंबंधी निश्चिती नाही.
2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलींच्या काळात बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सुनावणी महाराष्ट्रात होऊन या प्रकरणी 11 दंगलखोरांना जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. तथापि, त्यांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना क्षमा देऊन सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता.
या निर्णयाला बिल्किस बानो यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्या आव्हान याचिकेची सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, एका न्यायाधिशांनी अंग काढून घेतले आहे. न्या. अजय रस्तोगी आणि न्या. बेला एम. त्रिवेदी यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र न्या. बेला त्रिवेदी यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली आहे.









