परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून पाकची धुलाई : दहशतवादी पाकिस्तानशी चर्चा शक्यच नाही : एससीओ परिषदेत भारताचा हल्लाबोल
पणजी : शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी गोव्यात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे वर्णन यजमान भारताने दहशतवादी देशाचा प्रवक्ता अशा शब्दांत केले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले भारत-पाक बैठक होऊच शकत नाही. दहशतवादाला पाकिस्तानने खतपाणी घालायचे, दहशतवादाचे समर्थन करायचे, भारताला दहशतवाद्यांचा जाच द्यायचा, आमचे जवान, आमचे नागरिक प्राण गमवितात आणि अशा देशाबरोबर चर्चा? शक्यच नाही ती, अशा शब्दांत मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. बिलावल भुट्टो हे संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले आहेत. संघटनेसंदर्भात व बैठकीतील मुद्द्यांवरच चर्चा झाली. भारत-पाक बैठक झाली नाही, दहशतवादी देशाच्या प्रवक्त्याशी आम्ही चर्चा करू शकत नाही. तडजोड तर नाहीच नाही, असे जयशंकर म्हणाले. शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) गोवा राज्यातील परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत भारतातर्फे दहशतवादाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दहशतवादास कोणत्याच परिस्थितीत समर्थन दिले जाऊ शकत नाही. सर्व प्रकारचा दहशतवाद संपलाच पाहिजे. सीमापार चालू असलेल्या दहशतवादाचेही समूळ उच्चाटन करण्याची गरज भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली. दहशतवादासाठी चालू असलेली आर्थिक रसद रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभावी कारवाई झाली पाहिजे. एससीओच्या यापूर्वी झालेल्या परिषदेतील विविध ठरावांची आठवण जयशंकर यांनी करून दिली आणि दहशतवादाविरोधातील लढाई हा मुख्य मुद्दा असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दक्षिण गोव्यातील बाणावली येथील ताज एक्झॉटिक या पंचतारांकित हॉटेलातील दोन दिवसीय एससीओ परिषद काल शुक्रवारी संपुष्टात आली. त्या परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनाही बोलण्याची संधी देण्यात आली.
पाकिस्तान एससीओला महत्त्व देतो
यावेळी झरदारी म्हणाले की, आपण या परिषदेसाठी भारतात आलो याचा अर्थ पाकिस्तान एससीओला खूप महत्त्व देतो हे दर्शवते. एससीओच्या अंतर्भूत असलेल्या परस्पर विकासाच्या सर्व तत्वांचे पाकिस्तानतर्फे पालन केले जाते. एससीओ हे रचनात्मक परस्पर समन्वय, समंजसपणा, सुरक्षा, विकास अशा सर्व गोष्टी करण्याचे एक व्यासपीठ आहे. पाकिस्तान बहुपक्षीयतेसाठी वचनबद्ध असून आंतरराष्ट्रीय मंचावर आघाडीची भूमिका साकारात आहे, असे भुट्टो यांनी सांगितले.
हवामान संकट मानवतेसाठी धोका
परिषदेत भारतातर्फे दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. त्याच्याशी लढणे हा एससीओच्या प्रमुख ठरावांपैकी एक आहे असेही जयशंकर यांनी निदर्शनास आणले. युरेशियन जोडणीला पुढे नेण्यासाठी एससीओ हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. हवामान संकट मानवतेसाठी धोका असून त्याविरोधात सामूहिक कृती करावी, असे आवाहन भुट्टोs यांनी केले. एससीओ अंतर्गत दारिद्र्या निर्मूलनासाठी विशेष कार्यगट स्थापन करण्याची सूचना भुट्टो यांनी केली. पाकिस्तान देश सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करीत असून मदतीची अपेक्षा करीत असल्याचे भुत्तो म्हणले.
झरदारींकडून 370 कलमाबाबत अप्रत्यक्ष संकेत
दहशतवादावर भुट्टो यांनी स्पष्टपणे कोणतीच भूमिका मांडली नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी काश्मिरचा मुद्दा अप्रत्यक्षपणे उपस्थित केला. काश्मिरमधून 370 वे कलम हटवण्यात आले, याबाबत त्यांनी अप्रत्यक्ष काही संकेत दिले. परंतु स्पष्ट बोलणे त्यांनी टाळले. पाक दहशतवाद हटविण्यास तयार नाही व भारत माघार घेण्यास राजी नाही, अशी एकंदरित दोन्ही देशांची भूमिका बैठकीत दिसून आली.
हस्तांदोलन नाहीच, दुरुनच नमस्ते!
या बैठकीत जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन केले नसल्याचे समोर आले असून दुरूनच नमस्ते म्हणून हात जोडून त्यांचे स्वागत केले. त्याला प्रतिसाद म्हणून भुट्टोs यांनी देखील त्यांना नमस्ते म्हटले.









