नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे विदेश व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांच्या भारत दौऱयाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. ते शांघाय कोऑपरेशन संघटनेच्या परिषदेसाठी भारतात येत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध या दौऱयामुळे सुधारतील अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे, अशी प्रतिक्रिया या संदर्भात पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, तोंडदेखले का असेनात पण संबंध सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न होत असतील तर त्यांचे स्वागत करावे, अशीही प्रतिक्रिया पाकिस्तानात व्यक्त होत आहे. भुत्तो यांचा कार्यक्रम अद्याप निश्चित नाही.
भारतात आल्यानंतर ते भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते एससीओ परिषदेत भाषण करणार आहेत. या भाषणात ते भारत-पाकिस्तान संबंधांसंबंधी काय बोलतात याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. पाकिस्तानने दहशतवादाशी आपले नाते पूर्णतः तोडल्याशिवाय भारताला त्या देशाशी सौहार्दाचे संबंध स्थापन करता येणार नाहीत, अशी भारताची भूमिका आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. अशा स्थितीत त्यांचा हा दौरा होत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले आहे. तथापि, भारतात त्यांचे काय कार्यक्रम असतील यासंबंधीं सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.









